Breaking News

श्रीपाल सबनीसांचा पुनाळेकरांना उत्तर देण्यासाठी मॉर्निंग वॉक


पुणे, 11 - नरेंद्र मोदी यांच्या एकेरीत उल्लेख करीत त्यांच्यावर टीका करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी मॉर्निंग वॉक करीत ‘सनातन संस्थे’चे संजीव 
पुनाळेकर यांच्या वादग्रस्त ट्विटला उत्तर दिले. सबनीस यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते. पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान मॉर्निंग वॉक काढण्यात आला.
मोदींवर केलेल्या टीकेनंतर ‘सनातन संस्थे’चे वकील संजीव पुनाळेकर यांनी सबनीस यांच्याविरोधात वादग्रस्त ट्विट केले होते. ‘श्रीपाल सबनीस मॉर्निंग वॉकला जात जा’ अशा आशयाचे ट्विट पुनाळेकर यांनी केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या ते मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्यावरच झाली होती. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन संस्थे’च्या एका साधकाला कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुनाळेकर यांच्या ट्विटवरून सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. श्रीपाल सबनीस यांना ही धमकीच देण्यात आली आहे, अशीही प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली होती.