Breaking News

बालकांच्या गुणवत्तापूर्ण आयुष्याबाबत मंथन


औरंगाबाद, 11 - जन्मासोबतच आलेल्या आजारांचे निदान करून कशा प्रकारचे उपचार करावेत, विंचू, साप, तसेच अन्य प्रकारच्या विषबाधेत नेमके उपचार कसे असावेत, यावर मंथन करून बालकांना गुणवत्तापूर्ण आयुष्य कसे जगता येईल, याबाबत अनेक तज्ज्ञांनी येथील महा पेडिक्रिटीकॉन परिषदेत रविवारी (ता.दहा) दिशा दिली. 
बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. 
दहा ते पंधरा वर्षांत अतिजोखमीच्या बालकांना वाचवण्यात बालरोगतज्ज्ञांना यश आले. मात्र, यापुढे जाऊन 
त्यांना गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता यावे, यासाठीच्या उपचारांवरही प्रसिद्ध डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. परिषदेत ग्रामीण भागातील बालरोग तज्ज्ञांनी अत्यवस्थ बालकांना ओळखून अतिदक्षता विभागात कधी हलवावे, हलवताना काय काळजी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विषबाधा झाल्यास त्याचे परिणाम काय असू  शकतात, अशावेळी प्राथमिक उपचार कसे करावेत, यावर डॉ. राजेश चोखानी, डॉ. आनंद छांगील्ये, डॉ. संतोष सोन्स, डॉ. महेश मोहिते, डॉ. विनायक पत्की यांनी मार्गदर्शन केले. तसेच जन्मानंतर हदयरोग कसा ओळखावा,  त्यावर शस्त्रक्रियेसाठी काय काळजी घ्यायला हवी, यावर मुंबई येथील डॉ. के. शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले. सर्प, विंचू दंश झाल्यानंतर काय करावे, यावर डॉ. दयानंद नकाती, डॉ. नीलेश शेवाळे यांनी माहिती दिली. आगामी काळात व्हेंटिलेटरला एक्मो हा अतिशय प्रभावी पर्याय ठरणार आहे, असे डॉ. राजेंद्र वैद्य यांनी सांगितले.