Breaking News

सांगलीवाडीत अपघातात एक ठार


सांगली, 10 - भरधाव मोटारीने रस्त्याच्या विरुद्ध बाजूस थांबलेल्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने एक ठार, तर महिलेसह दोघे जखमी झाले. कमलाकर महादेव छत्रे (61, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक सहा, वारणाली विश्रामबाग) असे मृताचे नांव आहे, तर जखमींमध्ये त्यांची पत्नी सुशीला (55) व फिरस्त विक्रेता इब्राहीम दगडू शहा (50, भडगाव, जि. बेळगांव) यांचा समावेश आहे. सांगलीवाडीत आयर्विन पूल उतरतीला दुपारी साडेचार वाजता हा अपघात झाला. कमलाकर छत्रे सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात सेवेत होते. तीन वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. दुपारी ते पत्नीसह दुचाकीवरुन (क्र. एम.एच. 10 एबी 4806) समडोळी (ता. मिरज) येथे निघाले होते. आयर्विन पूल उतरतीला त्यांना इर्बाहीम शहा हा फिरस्ता चाळण विक्रेता दिसला. तोही पुलावरुन सांगलीवाडीकडे निघाला होता. छत्रे यांनी चाळण घेण्यासाठी दुचाकी थांबवून रस्त्याकडेला घेतली. त्याचवेळी इस्लामपूरहून सांगलीकडे मोटार (क्र.एम.एच. 10 एएन 5734) येत होती. मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन, चाळण खरेदीसाठी थांबलेल्या छत्रे दाम्पत्यास धडकली. यामध्ये हे दाम्प्त्य व विक्रेता शहा जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र कमलाकर छत्रे यांचा मृत्यू झाला होता. अपघाताचे वृत्त समजताच छत्रे यांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येंने जमा झाले होते.