Breaking News

पुणे एटीएस पथकाला इसिसकडून धमकी


पुणे (प्रतिनिधी), 14 - राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला इसिसच्या नावाने धमकीचा मेल मिळाला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना प्राप्त झालेल्या एका मेलमध्ये एटीएसच्या पुणे युनिटचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) भानूप्रताप बर्गे व त्यांचे कुटुंब उध्वस्त करणार असल्याची भाषा वापरण्यात आली आहे. या मेलचा तपास पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून केला जात आहे. पुणे एटीएस कार्यालयासमोर एके 47 घेऊन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्याभरात एटीएसच्या पुणे युनिटची कारवाई चांगली झाली आहे. एटीएस ने डिसेंबर 2015 मध्ये इसिसच्या संपर्कात आलेल्या एका 16 वर्षीय मुलीचे समुपदेशन करून तिला परावृत्त केले होते. मुलीच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सएप मध्ये परदेशातील काही जणांचे मोबाईल क्रमांक मिळून आले होते. पोलिसांनी तिच्यावर कारवाई न करता तिला समजावून सांगत परावृत्त केले. त्याच बरोबर मुंबई येथून गायब झालेल्यापैकी एकाला एसीपीबर्गे, पोलीस निरीक्षक बापू कुतवळ, सुनील तांबे, अरविंद गोकुळे यांच्या पथकाने शोधून काढले होते. यासोबतच दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसी कारवाईसोबतच संवाद साधायला सुरुवात करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मगुरू, मौलवी यांच्या बैठका घेण्यासोबतच मस्जिद 
आणि मदरशांमध्ये भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला जात आहे. इसिसचा वाढता धोका आणि त्याकडे तरुणांचे वाढलेले आकर्षण चिंतेचा विषय आहे. एटीएसकडून सुरु असलेल्या कारवायांमुळे काही तरुण परावृत्त 
होण्यात यश आले आहे.  यासंदर्भात आयसिसच्या नावाने मुंबई पोलिसांना 2 आठवड्यांपूर्वी पत्र मिळाले होते. बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची भाषा या पत्रात होती. हे पत्र पुणे पोलिसांकडे तपासासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष शाखेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यासंदर्भात विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बर्गे यांच्या नावाने धमकीचे पत्र आले असून त्याचा तपास सुरु असल्याचे सांगितले. इंग्रजीमधून आलेले हे पत्र खरोखरीच इसिसकडून आले आहे का, कोणी इसिसच्या नावाखाली धमकी दिली याचाही पोलीस शोध घेत आहेत.