मराठा सेवा संघाने हिंदु बहुजनांचे नेतृत्त्व करावे...
जमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शिंदखेड राजा येथे शिवधर्म स्थापना महोत्सवही साजरा केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या राज्यव्यवस्थेवर आणि सामाजिक विचारांवर निष्ठा असणार्या आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श मानणारी महाराष्ट्रातील तरुणांची पिढी एकत्र येत असते. छत्रपती शिवाजी महारांजावर संत चळवळीचे संस्कार रुजविणार्या जिजामाता यांच्या समतेचे अधिष्ठान मांनणारे आमि मातृसत्ताक व्यवस्थेचा स्विकार करणारे या जयंती उत्सवला नेहमीच उत्सव मानत आले आहे. केवळ शिंदखेड राजामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिजामाता यांचा जयंती महोत्सव साजरा केला जातो. या अनुषंगाने आज महाराष्ट्रातील समुदायासमोर काही विचार प्रकट करावेत असे मनात आले. जिजामाता या आमच्या मातृसत्ताक व्यवस्थेच्या प्रेरणास्त्रोत आहेत. हा प्रेरणास्त्रोत समतेची विचारधारा मानणारे पुढे नेत असतात. आज देशात आणि राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित राजकीय सत्ता स्थापन झाली आहे. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याशी काडीचाही संबंध नाही. परंतु हिंदु बहुजन समाजाच्या आदर्श प्रतिकांना हायजॅक करण्याची संस्कृती आता संघाने अधिक वेगाने पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. नुकताच त्यांनी पुणे येथे शिवसंगम मेळावा घडविला. या मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही विकृतपणे सादर केली. मात्र या विरोधात शिवधर्म किंवा मराठा सेवा संघ यांनी प्रतिक्रिया किंवा जाहीर चर्चा करण्याचे टाळले आहे. याउलट संघाशी काही प्रमाणात जुळवून घेण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी चालविला आहे. आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा समतेचा विचार गावागावात रुजविण्याची गरज आहे. मराठा महासंघाने आपली तरुण सेना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उभी केली. मात्र या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाची चळवळ अद्यापही उभी केलेली दिसत नाही. संभाजी ब्रिगेडचे केडरायझेशन करणारे कार्यक्रम महाराष्ट्रात सातत्यपूर्ण होतांना दिसत नाहीत. हिंदु बहुजन समाजात केडरायझेशन होत नसल्यामुळे समतेची चळवळ गतीमान करणे कठिण होते. वास्तविक मराठा सेवा संघाने या चळवळीला अधिक वेग द्यायला हवा. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय सत्तेत ज्याप्रमाणे मराठा आणि ब्राह्मण यांची अघोषित युती दिसून येते ती मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अद्यापतरी दिसलेली नाही. परंतु ज्या विचारांच्या विरोधात आपण संघटन बांधणी करतो त्या संघटनेला वैचारीक आधार द्यावा लागतो. वैचारीक आधार ज्या इतिहास पुरुषांच्या विचारातुन आपण घेतो त्यांचा इतिहास आणि चळवळी या तरुणांना मार्गदर्शक ठरतात. मात्र तरुणांना समग्र इतिहास वाचण्यासाठी प्रवृत्त करण्याकरती आणि इतिहासाचा क्रांती प्रवण अर्थ समजावून सांगण्यासाठी त्या विचारांचे सार एकत्रित करुन त्यांच्या आधारावर केडरायझेशन करायला हवे. मात्र या कामी मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेड यांनी अजुनही म्हणावा तितका लिड घेतलेला नाही. परिणामी महाराष्ट्राच्या भूमिवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले हातपाय पसरु लागला आहे. परवा पुण्यात झालेला शिवशक्ती संगम मेळावा हा खरे तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बेल्ट समजल्या जाणार्या विभागातच घेतला गेला. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातुन या क्षेत्रातील मराठा राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न संघाने चालविला आहे. गेल्या अडीचहजार वर्षांत सामाजिक चढ उतार अनेक आले. परंतु संत चळवळीनंतर आणि इंग्रजांनी आधुनिक जीवन प्रणाली आणल्यामुळे हिंदु बहुजनांना मिळालेले शिक्षण आणि त्यातून निर्माण झालेले फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाच्या सामाजिक वास्तवाला बदलणारे ठरले. परंतु त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मराठा सेवा संघाने हिंदु बहुजनांचे नेतृत्त्व करावे.