Breaking News

क्लीन चीट अहवाल प्रकरणास आर.आर.हांडेच जबाबदार ; गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापूरी

 मुंबई/प्रतिनिधी । 12 - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ क्लीनचीट अहवालाचा शिमगा सरला तरी कवित्व मात्र अद्याप सुरूच आहे. लोकमान्य लोकशक्तीलाही आपले भान सोडायला लावणारे हे प्रकरण गंभीरतेच्या शुक्लकाष्ठतेत अडकून ठेवण्यात स्वारस्य दाखविणार्‍या हितचिंतांनी जाणीवपुर्वक संशयिताचा मार्ग मोकळा करण्याचा मार्ग आरंभिला की काय अशी शंका या कवित्वामुळे निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी सजग होऊन कोल्हापूरी बाणा दाखविण्याची आवश्यकता साबांत बोलून दाखविली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ निर्दोष असल्याच्या वावड्या उठवत वातावरण निमिर्र्ती करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. या प्रयत्नांमुळे साबांतील भुजबळ समर्थक अलिबाबांची टोळी सहभागी असणे भ्रष्ट धर्माला साजेसे असले तरी समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या माध्यमांनीही कळत नकळत सहभागी होण्याचे धाडस दाखविणे अपेक्षित नाही. म्हणूनच भ्रष्टाचारावर प्रहार करण्याऐवजी भ्रष्टमतीला वाचवून साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय बदनामीच्या षडयंत्रात माध्यमांनी अजाणतेपणी का होईना दिलेला सहभाग संभ्रमीत करणारा आहे. अशा या माध्यम सहभागामुळे तपास यंत्रणाही बुचकाळ्यात न पडली तरच नवल.
खरे तर, महाराष्ट्र सदन प्रकरणी मोठा घोटाळा जाला हे जगजाहीर आहे. त्या संदर्भात आवश्यक ते सारे पुरावे देखील तपास यंत्रणेच्या हाती आहेत. केवळ साबांचा अहवाल तेव्हढा अपेक्षित होता. आणि या अहवालानेच नंतर तपासकामात खोडा घालण्याचे हेतूने संभ्रम निर्माण केला. हा अहवाल कुणी तयार केला? तो एसीबीकडे कसा पोहचला? या सार्‍यांचा उहापोह वेळोवेळी झाला आहे. त्या आगाऊपणाची शिक्षा म्हणून मुख्यअभियंता उल्हास देबडवार आणि अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. मात्र या कटपथकातील महत्वाचा दुवा किंबहुना ज्यांनी हा अहवाल तयार केला ते अधिक्षक अभियंता आर.आर.हांडे यांना मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवले गेले. थोडक्यात या क्लीन चीट अहवाल प्रकरणी उल्हास देबडवार, अतुल चव्हाण आणि आर.आर.हांडे यांचे संगनमत होते आणि या सार्‍या प्रक्रियेत साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले. त्यांना या प्रकरणाची कुठलीच भनक लागू दिली नाही आणि ही बाब जेंव्हा उघड झाली तेव्हा सुधारित अहवाल तयार करून तो साबांमंत्र्यांच्या स्वाक्षरीने पाठविला गेला. त्याच नव्या अहवालाचा आधार घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या त्या जोडपत्राचा जुन्या अहवालाशी संबंध जोडत भुजबळांच्या निर्दोषत्वाशी नाते सांगीतले जात आहे. खरे तर हा देखील त्या त्रिमुर्ती क्षेत्रीय अभियंत्यांच्या कटाचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी सांगीतले जाते. यात पुन्हा कारवाई कक्षेच्या बाहेर असलेले अधिक्षक अभियंता आर.आर. हांडे हे प्रसार माध्यमांना आपल्या सोईची माहिती पुरवून मॅनेज बातम्या छापून आणित असल्याच्याही चर्चा साबांत सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर अधिक्षक अभियंता आर.आर.हांडे यांच्या मुसक्या आवळून या तिन्ही क्षेत्रीय अभियंत्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आपला कोल्हापूरी बाणा सिध्द करावा असे आवाहन काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी चंद्रकांत पाटील यांना केले.
ना. चद्रकांत पाटील यांच्या बदनामीचा डाव 
ना. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न, निस्वार्थी,निष्कंलक व्यक्तीला बदनाम करण्याचे षडयंत्र सा.बा.तील अतुल चव्हाण, उल्हास देबडवार व आर. आर. हांडे व त्यांची कंपू मंडळी करत असल्याची चर्चा संघ परिवारात सुरू आहे. संघ परिवारात व भाजपच्या गोटात अशा निस्वार्थी मंत्र्याला संबधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या कारस्थानामुळे बदनामीच्या भोवर्‍यात गुंतविले जात अशी चर्चा सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये व साबां खात्यात सुरू आहे. एसीबी दोषी अधिकार्‍यावर  गुन्ह दाखल करेल,तो कायद्याचा व प्रशासकिय भाग झाला, परंतू तोपर्यंत चद्रंकात दादांची बदनामी होवू नये हीच अपेक्षा !