नव्या लढ्याची नांदी
रोहीत वेमुला प्रकरणाने देशभरात आरएसएस आणि भाजप सरकारला अडचणीत आणले आहे. परंतू कोणत्याही प्रकरणाला भलतेच वळण देण्याची अनैतिक सवय संघाला असल्यामुळे या प्रकरणातही त्यांनी तोच प्रकार चालवला आहे आणि खेदाची बाब अशी की प्रस्थापित किंवा ब्राह्मणी वर्चस्व असणारी प्रसार माध्यमेही या अनैतिकतेत सामिल आहेत. त्यामुळे प्रस्थापित प्रसार माध्यमांना आता संविधानानुसार काम करत नसतील तर जनतेची फसवणुक किंवा दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा. देशाचा एक संशोधक तरूण जातीव्यवस्थेचा बळी जातो यावर तिखट भाष्य करण्याऐवजी त्या तरूणाची जात नेमकी कोणती यावर उलट सुलट चर्चा घडवून बुध्दीभ्रम केला जात आहे. काहींनी तर तो तरूण वडार जातीचा असल्याचा शोध लावून तो दलित नसल्याचे सांगत आहेत. अशा निर्लज्जांना हे विचारावेसे वाटते की वडार जात या देशात उच्च जात मानली गेली आहे काय? याउलट तो तरूण ओबीसी जातीचा असेल तर प्रश्न आणखीच देशव्यापी होईल. कारण या देशात ओबीसींची संख्या ही बावन्न टक्के आहे. त्यांचेही शोषण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनेच केल्याचे आधुनिक भारतातील पहिले शुद्र समाजातील तत्वज्ञ महात्मा जोतिबा फुले यांनी सांगितले होते. हिंदू समाजव्यवस्थेतील चवथा म्हणजे शुद्र वर्ण असलेल्या आजच्या ओबीसींनाही शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, हेच रोहीतच्या जातशोधन प्रकारात दिसत आहे. या प्रकरणात दलित, आदिवासी, भटक्या जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी यांनाही उच्च शिक्षणाच्या फंदात पडला तर काय करू याचा गर्भित इशाराच या प्रकरणात दिसत आहे. वास्तविक देशात अशा प्रकराच्या ज्या घटना घडताना दिसत आहेत त्या घडत नसून घडविल्या जात आहेत. संघ परिवाराने हिंदु बहुजन समाजाला मुस्लीम द्वेषाचे संस्कार करून संघटीत करतात आणि याच शक्तींचे रूपांतर ते नंतरच्या काळात दलित विरुध्द सवर्ण अशा लढ्यात करतात आणि त्यातूनच या देशात ब्राह्मण आपले जाळे बहुजनांवर पसरवून त्यांचे स्वामित्व हिंदु बहुजनांवर लादतात. त्यामुळे आज गरज आहे ती म्हणजे इतिहासात कधी नव्हे एवढा ब्राह्मण समुदाय अडचणीत आला आहे. कारण संघ परिवाराने भाजपची सत्ताआणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावून देखील त्यांना ब्राह्मण जातीतून पंतप्रधान करता आले नाही हे शल्य त्यांना आहेच. त्यातूनच आता संघ विचार त्यांच्या वेगवेगळ्या विंगच्या माध्यमातून लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. हैद्राबाद विद्यापीठात घडविल्या गेलेल्या प्रकरणातही अशाचप्रकारची पार्श्वभूमी आहे. रोहीत ला दलित म्हणूनच टार्गेट केले गेले असून त्यातही त्याने फुले-आंबेडकरी तत्वज्ञानाची भूमिका घेवून आपल्या लोकशाही अधिकाराचाही वापर केला. यात रोहीतचा ज्या पध्दतीने बळी घेतला गेला आहे ते पाहता आता हिंदू बहुजनांविरुध्द ब्राह्मणांनी आक्रमक डावपेचांना सुरूवात केल्याची साक्ष मिळते. त्यामुळे हे प्रकरण केवळ दलित विरुध्द ब्राह्मण असे नसून बहुजन विरुध्द ब्राह्मण या ऐतिहासिक लढ्यासारखे आहे. देशात समस्त हिंदू बहुजनांची एकजूट होणे गरजेचे आहे. पण याचा दुसरा अर्थ हा देखील होतो की आम्ही आमच्यातील घरभेद्यांनाही आता धडा शिकवायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा घेवून संघाच्या कळपात दाखल होणे हा खरेतर आंबेडकरद्रोह आहे. उत्तर भारतात भाजप बरोबर झालेली सत्तायुती ही तुल्यबळ राजकीय पक्षांची होती. परंतु महाराष्ट्रात झालेली युती ही सत्तेच्या याचनातून झाली आहे. बुध्दिमान दलित तरुणाच्या बळी जाण्याने देश ढवळून निघत असतांना या शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृती केंद्राना जोडण्याचा प्रयत्न कला जात आहे जो फुले-आंबेडकर यांच्या चळवळीची शुध्दता हरविण्याचा प्रकार आहे. या सर्व प्रश्नांवर आपणास नव्याने संघटीत व्हावे लागेल जे अब्राह्मणी शक्तींच्या नव्या
लढ्याची नांदी ठरेल.