रोहितच्या कुटुंबियांनी नाकारली हैदराबाद विद्यापीठाची आर्थिक मदत
हैदराबाद/वृत्तसंस्था । 25 - हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या कुटुंबियांनी विद्यापीठाने देऊ केलेली आर्थिक मदत नाकारली आहे. रोहितच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही वेमुला कुटुंबियांनी केली आहे.
जातीय व्यवस्थेचा बळी ठरलेला रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे प्रशासन नरमले असले तरी,आम्ही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत स्वीकारणार नसल्याचे खडे बोल रोहित वेमुलाच्या कुटुंबियांनी यावेळी सांगितले. हैदराबाद विद्यापीठाकडून आठ लाखच काय आठ कोटी दिले तरी ते आम्ही स्वीकारणार नसल्याचे वेमुला कुटुंबियांनी स्पष्ट सांगितले. हैदराबाद विद्यापीठात आलेल्या वेमुला कुटुंबियांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.