अस्वस्थ निवड
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची निवड ही पक्षांर्गतच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. अर्थात कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष कोण असावा ही त्या-त्या पक्षाची अंर्गत बाब आहे. परंतु सार्वजनिक क्षेञात अशा बाबींची दखल माञ घेतली जाते. शहा यांना पुन्हा अध्यक्षपदी नियुक्त केले जाणार नाही, याची सातत्याने चर्चा होती. जेव्हा संघप्रणित संघटनांविषयी सार्वजनिक चर्चा सुरु होतात तेव्हा संघानेच त्याची पेरणी केलेली असते. म्हणजे भाजपच्या अध्यक्षपदासाठी शहा यांना संघाची पसंती नव्हती. गडकरी ही संघाची पहिली पसंती. पण सत्ता आणूनही त्यांना आपले मत रेटून नेता येत नाही ही त्ययंची अस्वस्थता बरेच काही दर्शवते. जेष्ठ नेते म्हणूनच नव्हे तर भाजपला सत्तेच्या उर्जेपर्यंत आणण्यात ज्यांचा मोठा वाटा होता त्या लालकृष्ण अडवाणी यांनाही या निवडीपासून दूरच ठेवले गेले. त्यामुळे पक्षात अडवाणी यांचे नेतृत्व मानणारा एक मोठा गट आहे जो आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही कार्यरत आहे. हा गट प्रामुख्याने उत्तर भारतातील असावा. राजकारणात योग्य संधीची नेहमीच प्रतिक्षा केली जाते. ज्यांच्या गाठीशी अनुभव आहे असे नेते हा संयम अधिक राखतात. असो. अमित शहा यांची अध्यक्षपदाची दुसरी टर्म ही प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील त्यांचा लोकसभा निवडनुकीतील अनुभव लक्षात घेवूनच देण्यात आली, असे म्हटले तरी ते अर्धसत्य म्हणावे लागेल. कारण उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका या 2017 मध्ये होणार आहेत. त्यामुळे ते लक्षात घेवुन जर निवड केली असेल तर शहा यांना तिसरी टर्म निश्चित मिळेल असा याचा अर्थ होतो. पण यात संघ किंवा भाजपच्या कार्यकारिणी यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरचष्मा सध्यातरी पक्षावर अधिक असल्याचे दिसते. त्यामुळे नाइलाजास्तव का असेना पण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही मेरिट पेक्षा वर्चस्वातून अधिक असल्याचे स्पष्ट होते. लोकसभा पाठोपाठ वेगवेगळ्या राज्य विधानसभांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवता आले नाही. या सर्व निवडणुकांमध्ये शहा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यातही बिहार विधानसभा निवडणूकीतील पराभव भाजपला जिव्हारी लागणारा होता. पण या निवडणूकीतील पराभवाचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर फोडले गेल्यामुळे शहा यांच्या नेतृत्वाविषयीची चर्चा मागे पडली. परिणामी शहा यांना दुसरी टर्म मिळण्यास फारशी आडकाठी आली नाही. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर लोक परंपरागत सत्ताधार्यांना कंटाळले होते. त्याचा परिणाम सत्ताबदलात होणारच होता, ते निमित्त शहा यांच्या यशात होते. या सर्व बाबींचा विचार केला तर भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड झाल्याचा विचार केला जाईल.