Breaking News

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नांदगाव येथे स्वच्छता मोहिम


 नाशिक /प्रतिनिधी। 8 -  नांदगाव येथे प्रशासनातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगावची शपथ घेत परिसर स्वच्छता करण्यात आली.
जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनानुसार आणि  अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार अनिल गवांदे, नगराध्यक्षा शैला गायकवाड, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला.
नगर परिषदेच्या प्रांगणात मोहिमेस सुरूवात करण्यात आली. नागरिक तसेच दुकान मालकांना आपला परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मोहिमे अंतर्गत मुख्य बाजारापेठेसोबत पॉवर हाऊस, कोर्टगल्ल्ली, अहिल्यादेवी चौक, शनीमंदिर पुलाचा भाग, बौद्धनगर, दत्तनगर, पोलीस स्टेशन, बालाजी चौक, म.फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागात  लोकसहभागातून मोहिम राबविण्यात आली. शहरातून जाणार्‍या शाकंबरी नदीपात्राची स्वच्छता जेसीबीने करण्यात आली. रस्त्यालगतच्या टपर्‍या आणि दुकानांना स्वयंसेवी संस्थेतर्फे कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.
मोहिमेत नगरसेवक, सेवाभावी संस्था, बचत गट, आयटीआयचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसीचे पथक, माजी सैनिक आदींनी सहभाग घेतला. विद्यार्थी नागरिक यांनी उत्स्फुर्तपणे घरून स्वचछतेसाठी साहित्य आणले होते. प्रशासनातर्फेदेखील साहित्याची व्यवस्था करण्यात आली होती. कचरा उचलण्यासाठी 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरची व्यवस्था  करण्यात आली. मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी विविध स्तरावर बैठका आणि जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी आणि स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले. एक आठवड्यापासून या मोहिमेचे नियोजन सुरू होते. या मोहिमेत सातत्य ठेवत नांदगाव शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.स्वामी यांनी सांगितले. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेऊन शासनाने सुरू केलेल्या अभियानात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मोहिम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुशवाह यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे.