विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वात महागडा शिलेदार
मुंबई,4 - आयपीएलमधला सर्वात महागडा शिलेदार भारताचा वन डे आणि टवेन्टी टवेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाही, तर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा असल्याचं बीसीसीआयनेच स्पष्ट केलं आहे. अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिलेल्या वचनाला बीसीसीआय जागली आहे.
बीसीसीआयने आयपीएलमधल्या नामवंत भारतीय आणि परदेशी शिलेदारांचं मानधन आपल्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. त्यानुसार ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ विराट कोहलीला 15 कोटी रुपये वेतन मोजत आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून आता पुण्याच्या फौजेत सामील झालेल्या धोनीचं अधिकृत वेतन साडेबारा कोटी रुपये आहे. रॉयलचॅलेंजर्स बंगलोरनं विराट कोहली आणि ख्रिस गेल या दोन शिलेदारांना आपल्या संघात कायम राहण्यासाठी वाढीव वेतन दिलं आहे. विराट कोहलीचं वेतन साडेबारा कोटींवरून 15 कोटी, तर ख्रिस गेलचं मानधन साडेसात कोटींवरून आठ कोटी
चाळीस लाख करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने हरभजनसिंगचं वेतन साडेपाच कोटींवरुन आठ कोटी, तर अंबाती रायुडूचं वेतन चार कोटींवरुन सहा कोटी केलं आहे.