Breaking News

जातीव्यवस्थेचे विध्वंसक रुप...


रोहित वेमुला या स्कॉलर विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. परंतु व्यवस्थेवर चिड निर्माण होण्याऐवजी त्यांनी भावूक होण्याचाच प्रकार अवलंबला. रोहितची आत्महत्या ही हत्या आहे अशा प्रकारची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. रोहितला व्यवस्थापनाने विद्यापिठ, वसतीगृह आणि परिसरातील कँटिन या सर्वच ठिकाणी निष्काषित केले होते. त्यामुळे वसतीगृहाच्या खोलीमध्ये रोहितने प्रवेश कसाकाय केला? हा प्रश्‍न आता उभा राहिला आहे. व्यवस्थापनाचे सर्वच अधिकारी, पदाधिकारी यांनी त्यास निष्काषन कार्यकाळात वसतीगृह आणि परिसरात प्रवेशाशची मनाई केल्यावर तो एकाएकी खोलीतही जातो आणि आत्महत्याही होते हा प्रकार संशयाला पुष्टी देेणारा आहे. त्यामुळे रोहितच्या 
आत्महत्या प्रकरणाची चौकशी करतांना ती हत्या आहे का? याचीही चौकशी व्हायला हवी. विद्यापिठ प्रशासनाने एखाद्या विद्यार्थी संघटनेला एवढे डोक्यावर चढवून घेणे की ज्यामुळे तळागाळतील समाज व्यवस्थेतील मुलाला जीवन संपवावे लागते. म्हणजे एबीव्हीपी सारख्या विद्यार्थी संघटना या कोणत्या स्तरावर देशपातळीवर आगामी काळात काम करणार आहेत याची झलक यातून मिळते. वास्तविक एबीव्हीपी ही संघटना आरएसएसची विद्यार्थी विंग आहे. त्यामुळे संघाच्या कोणत्याही विंगचे नेतृत्व हे ब्राह्मण समाजाच्याच हातात आहे. परंतु संघटनांमध्ये बहुजन समाजातील युवकांना पुढे करुन ते आपली निती त्या माध्यमातून लागू करत आहेत. याचा अर्थ विषमतेची निती चालू ठेवत असतांना त्याचा आरोप थेट ब्राह्मण जातीवर येवू नये याचीही काळजी घेतली जाते. दुसर्‍या बाजूला ज्या केंद्रिय मंत्री महोदयांनी विद्यापिठ प्रशासनाला पत्र लिहून पाच विद्यार्थी निष्कासन घडवून आणले, त्या स्मृती इराणी यांनी यावादाला जातीय रंग देवू नये अशी मखलाशी केली आहे. वास्तविक जातीचे चटके केंद्रिय मंत्र्यांना कधी बोलावे लागलेले नाहीत. कारण जातीव्यवस्था ज्या धर्मात आहेत त्या धर्म व्यवस्थेशी त्यांचा संबंध आलेला नाही. त्यामुळे खरेतर त्यांच्या विरोधात जनमाणसातून गुन्हा दाखल होण्याची भावना प्रकट होत आहे. विद्यापीठे ही स्वायत्त असतांना मंत्र्यांचे पत्र कुलगुरुंना पाठविणे तेही विद्यार्थ्यी यांच्यावर कारवाईसाठी हे कोणत्याही नियमात न 
बसणारे आहे. त्यामुळे मुळातच केंद्रिय मंत्र्याचे पत्र हा कायद्याचा भंग आहे आणि या कायदेभंगामुळे एका विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली आहे. याचा थेट आरोप आता सत्ताधार्‍यांवरच करायला हवा. कारण देशात कोणत्या प्रकारची सामाजिक व्यवस्था कायम करायची आहे याचे निर्देश अशा घटनांमधून समोर येतात. रोहित वेमुलाची घटना ही जागतिक पातळीवर हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक विद्यापिठातील कुलगुरु, प्राध्यपकांनी विद्यापिठ प्रशासनावर कारवाई करण्याच्या प्रतिक्रिया पत्रातून व्यक्त केल्या आहेत. याचा अर्थ या प्रकरणातून भारतासारख्या सार्वभौम देशाची आंतरराष्ट्रिय पातळीवर नाचक्की झाली आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रिय संबंधातूनही हाताळायला हवे. कारण महासत्ता बनण्याची स्वप्ने पहाणारा 
भारत व्यक्तींच्या जीवनमुल्यांविषयी कीती गंभीर आहे याची देखिल यातून झलक दिसते. आधुनिक समाज रचना ही विज्ञानवाद आणि तर्कसंगत जीवन प्रणाली स्विकारणारी आहे. त्यामुळे मानव समाजातील भेदभाव करणारा विचार किंवा परंपरा कोणालाही स्विकार्य नाही. परंतु या देशातील जातीव्यवस्थेवर वर्चस्व असणार्‍या शक्तींना जातीय विषमतेच्या दरी आणखी रुंद करायच्या आहेत. कारण त्यावरच शोषकांचे इमले उभे आहेत. हे इमले कोसळून पडण्याची ज्या-ज्यावेळी शक्यता निर्माण होते, त्या-त्यावेळी ब्राह्मणी शक्ती वेगवेगळ्या अंगाने आपले विध्वंसक रुप प्रकट करतात याचीच परिणती रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणात दिसून येते.