Breaking News

मनिषा पाटीलचा राजीनाम्यास नकार



सांगली ः दि. 4 -  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना दोन दिवसात राजीनामे देण्याचे आदेश सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिले. त्यानुसार उपाध्यक्षांसह दोघा सभापतींनी शनिवारी ते दिले असून, अध्यक्षा आणि एक सभापती सोमवारी राजीनामा देणार आहेत. मात्र, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्यामुळे राजीनामा नाट्य रंगले आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांनी मनधरणी केली, मात्र ती वाया गेल्याने नवीन पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे या पदाधिकार्‍यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी त्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी सायंकाळी राजीनामे सुपूर्द केले. अध्यक्षा होर्तीकर आणि लांडगे सोमवारी शिंदे यांच्याकडे राजीनामे देणार आहेत. मात्र मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी लिंबाजी पाटील, कोठावळे कृषी समितीच्या दालनात शनिवारी गेले होते. त्यांच्यात तासभर चर्चा झाली. यावेळी तानाजी पाटील म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांनी सूचना दिल्यास मनीषा पाटील लगेच राजीनामा देतील. तुम्ही बाबर यांच्याशी चर्चा करा.
तानाजी पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. चर्चा असफल ठरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे.