Breaking News

मुद्रा बँकमधून बचत गटाना कर्जे देवू ः गुप्ता


सांगली ः दि. 4 - मुद्रा बँ क योजनेतून बचत गटांना कर्ज दिले जाईल, अशी ग्वाही बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी दिली. एकात्म समाज केंद्र आयोजित बचत गटांच्या मेळाव्यात ते बोलत होते. एकात्म समाज केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी अध्यक्षस्थानी होते.
रोटरी हॉलमध्ये कार्यक्रम झाला. सहाशेवर महिला उपस्थित होत्या. श्री. गुप्ता म्हणाले, समाज परिवर्तनात महिलांचे योगदान मोेठे आहे. दुर्बल घटकांत पत निर्माण व्हावी यासाठी बँकांनी काम करणे अपेक्षित आहे. आम्ही मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून ते यशस्वी करु. जरुरीप्रमाणे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ.
श्री. पुजारी म्हणाले, एकात्म समाजच्या महिलांचे हात लोणची, पापड, मेतकुटातून बाजूला काढून राष्ट्रीय उद्योगाशी जोडले पाहिजेत. ही त्यांचीच मागणी होती. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे प्रचंड श्रमाची तयारी आहे. 
साहित्य संमेलनात एकावेळी दहा हजार पोळ्या पुरवून त्यांनी ती सिद्ध केली. बँकांनी त्यांच्यावर विश्‍वास दाखवून कर्जपुरवठा केल्यास त्या मोठा उद्योग उभारु शकतात.
सहयोगी महिला बचत गटांतील 1 हजार महिलांना सहभागीदारी व मुद्रा बँक योजनेतून कर्ज दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. दहा महिलांना कर्ज मंजुरीचे पत्र देऊन त्याची सुरुवात झाली. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री. घाटे, विभागीय व्यवस्थापक संजय मणियार, उपव्यवस्थापक श्री. टिके, नाबार्डचे शिवकुमार, एकात्म समाज केंद्राचे विश्‍वस्त आर. डी. कांबळे, एम. एन. कांबळे, प्रधान सचिव भालचंद्र बापट उपस्थित होते.