डाळ गैरव्यवहारास बापटच जबाबदार - नवाब मलिक
मुंबई, प्रतिनिधी, दि. 9 - तूरडाळ गैरव्यवहारास राज्यसरकार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटच जबाबदार असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
तसेच अन्न व नागरीपुरवठा विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात दाखल केलेल्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली. डाळींच्या साठ्यावरील बंदी उठविण्याबाबत तत्कालीन पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी सरकारात्मक शेरा दिला होता. हा प्रस्ताव अवलोकानार्थ पुन्हा अन्न व नागरीपुरवठा विभागाकडे पाठविणे आवश्यक होते, परंतु गिरीश बापट यांनी परस्पर एका दिवसात हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात मंजूर करून घेतला. डाळ गैरव्यवहारात मंत्र्यांबरोबरच सचिवांनीही हात धुऊन घेतले. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन दोषींना उघड करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. गिरीश बापट यांनी पुणे न्यायालयात मलिकांवरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असून, या दाव्याचे क्षेत्र संपूर्ण राज्य आहे, त्यामुळे मुंबईत खटला वर्ग करून बापट यांना डाळ गैरव्यवहाराची कबुली कोर्टात द्यायला लावू, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
...तर लाल दिव्याच्या गाड्या फिरू देणार नाही : केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळी भागात शेतकर्यांना मदत करण्याच्या हेतूने राज्यसरकारला 3100 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर व शासन निर्णय वाचल्यानंतर असे निदर्शनास आले, की सदरील मदत ही कापूस या पिकाला वगळून दिली जाणार आहे. त्यामुळे जर राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी केंद्र सरकारच्या मदतीपासून वंचित राहिला, तर लाल दिव्याच्या गाड्या मराठवाड्यात फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित यांनी दिला.