मुंबईत जम्बो मेगाब्लॉक, अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द
मुंबई, प्रतिनिधी, दि. 9 - मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर 18 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळं 100 हून अधिक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात बेस्टच्या ज्यादा बसेस भायखळा आणि सीएसटी दरम्यान सोडण्यात येणार आहेत. तसेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्यानं लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते.