Breaking News

नव वर्षात जे.जे.रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळणार


मुंबई, प्रतिनिधी, दि. 4 -  भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोप-यातून लोक उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या पाहता बहुतांश जणांना उपचारांसाठी ताटकळत राहावे लागते. मात्र, 2016 हे वर्ष रुग्णांसाठी दिलासा देणारे आहे. कारण, नववर्षात या रुग्णालयाच्या आवारात नवीन दहा मजली ‘सुपरस्पेशालिटी’ रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधांचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या फेब्रुवारीपासून या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी दिली.
या रुग्णालयात स्वस्त दरात उत्तम उपचार होत असल्याने मोठया संख्येने रुग्ण उपचारांकरिता येतात. मात्र, रुग्णालयात गर्दी असल्याने उपचारास विलंब लागतो. सध्या रुग्णालयात औषध विभाग, शस्त्रक्रिया, न्यूरोलॉजिकल, एनआयसीयू, बालरोग, अ‍ॅनेस्थेशिया व आयसीयू हे विभाग कार्यरत आहेत. या वर्षी या सर्व विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कितीही रुग्णालये बांधली तरी ती कमीच आहेत. जे.जे. हे केवळ गरिबांचेच नव्हे तर मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व्यक्तींना तितकेच महत्त्वाचे वाटते. त्यात अलीकडच्या काही वर्षामध्ये साथीच्या आजारांमुळे वाढती रुग्णसंख्या व दहशतवादी हल्ल्यांमुळे रुग्णालयात उपचारांचा ताण वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 1800 खाटांची संख्याही अपुरी पडू लागली आहे. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेल्या मागणीनुसार आता जे.जे.ला सुमारे 881 कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीच्या रकमेतून ‘सुपरस्पेशालिटी’ रुग्णालय उभारण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, सध्या अवयव प्रत्यारोपणासंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम विविध संस्थांमार्फत करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणाचा खर्च लाखांच्या घरात आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या व्यक्तींना प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे खूपच अवघड असते. अशा वेळी बहुतांश जण शस्त्रक्रियांपासून दूर राहतात. त्यामुळे या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात गरजू रुग्णांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. लहाने यांनी दिली.
असे असणार रुग्णालय?
साधारणत: 90 हजार स्क्वेअर फूट असलेल्या विस्तृत जागेवर ही दहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसीस सुविधा, हृदयप्रत्यारोपण इत्यादी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. 16 प्रकारच्या स्पेशालिटी व 38 प्रकारच्या सबस्पेशालिटी सुविधांचाही लाभ मिळणार आहे. क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) विभागासाठी 200 खाटा व एकूण रुग्णालयात 1100 जादा खाटांची सोय करण्यात आलेली आहे.