Breaking News

वेलूक गावात उपविभागीय अधिकार्‍यांकडून दारूअड्डे नष्ट


मुंबई, प्रतिनिधी, दि. 4 - संपूर्ण मुरबाड तालुक्यात गावठी हातभट्टया व बेकायदेशीर धंद्यांना ऊत आला असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसताना गुरुवारी वर्षाअखेरीस मात्र टोकावडे पोलीस ठाण्यातील प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रभाकर यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांच्या मदतीने दारूचे आगार असलेल्या वेलूक गावात धडक देत दारूच्या सर्व हातभट्टया उद्धवस्त केल्या.
मुरबाड तालुक्यातील गावठी दारूचे आगार म्हणून ओळखल्या जाणा-या वेलूक गावात निम्याहून अधिक घरांमध्ये गावठी दारू बनवून विकली जाते. ही गावठी दारू पिण्यासाठी परिसरातील नागरिक येथे येत असतात. शिवाय येथून मुरबाड, शहापूर तालुक्यात गावोगावी दारू पाठवली जाते. ही बाब लक्षात घेत टोकावडे पोलीस ठाण्यातील विजय धुमाळ यांनी मागील वर्षी याच गावातील दारूधंदे व भट्टया उद्ध्वस्त केल्या होत्या. तसेच धसईमधील मटका व गुटखा बंद केला होता. मात्र राजकीय बळाने त्यांना काही काळासाठी खोटया तक्रारीमुळे निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर टोकावडे पोलीस ठाण्यात प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रभाकर यादव यांच्या मदतीने विजय धुमाळ यांनी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वेलूक जंगलातील अनेक हातभट्टया उद्ध्वस्त करत साहित्य जप्त केले, तसेच हजारो लिटर गावठी दारू ओतून दिली. या कारवाईने दारूनिर्मिती करणार्‍यांना मोठा दणका बसला आहे.