आमची सहनशक्ती आता संपली ः संरक्षणमंत्री
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 17 - पुन्हा एकदा पाकिस्तानला संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी इशारा दिला असून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण आमची सहनशक्ती आता संपली आहे. आम्ही काही ना काही नक्की करू असे त्यांनी म्हटले आहे. आता आम्ही जे दुःख भोगत आहे, तेच दुःख शत्रूला पण देऊ; पण आता जागा आणि वेळ मात्र आम्ही ठरवूफ असे वक्तव्य पर्रिकर यांनी केले आहे.
हवाई दलाच्या पठाणकोट हवाईदलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी हा इशारा दिला आहे. जयपूरमध्ये आयोजित क्रेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मैदानावर आयोजित सैन्य भरती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. इसिसच्या जाळ्यात आपले जवान फसू नयेत याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. वायूसेनेच्या एका जवानाला आपण पत्रकार असल्याची बतावणी करुन एका महिलेने काही संवेदनशील माहिती घेऊन पाकिस्तानला पुरवल्याचे एक प्रकरण नुकतेच उघड झाले होते. अजून तरी अशा घटना केवळ कनिष्ठ स्तरापर्यंत मर्यादित आहेत. पण, अशा घटना घडू नयेत यासाठी काही काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जवानांच्या भर्ती वेळीही या गोष्टींचा विचार केला जाईल, तसेच जवानांना सोशल मीडिया वापरण्यासंबंधी एक संहिता जाहीर केली आहे, हे
त्यांनी सांगितले.
