Breaking News

साहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये -शरद पवार


 पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी । 16
- 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलतांना राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पिंपरीच्या ग्यानबा-तुकाराम साहित्यनगरीत मोठ्या दिमाखात 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी उद्घाटन झाले.
निवडपद्धतीसंबंधीचा मुलभूत विचार करणे साहित्य महामंडळाने गरजेचे आहे. यापुढे पाच माजी संमेलनाध्यक्षांनी एक समिती बनवून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी. मते मागणे हे राजकारण्यांचे काम आहे, साहित्यिकांनी तोच कित्ता गिरवू नये, असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी पिंपरीच्या ग्यानबा-तुकाराम साहित्यनगरीत मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, आरपीआय नेते रामदास आठवले, राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट हेदेखील उपस्थित होते. 
सर्व भाषांचे एकत्र संमेलन व्हावं ः गुलजार
साहित्य संमेलनं भरवणे, लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी एकत्र येणे आणि वैचारिक देवाणघेवाण करणे ही केवळ महाराष्ट्रात घडणारी गोष्ट असल्याची कौतुकाची थाप ज्येष्ठ कवी गुलजार यांनी 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना दिली. तसेच भारतातल्या सगळ्या भाषांचे एकत्र संमेलन व्हायला हवे अशी अपेक्षा करताना याकामी महाराष्ट्रानेच पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही गुलजार यांनी केले.