Breaking News

तहसील पाठीमागे घडली घटना,पोलिसांच्या मध्यस्थीने महिलांचे आंदोलन मागे


बीड,दि.4 - सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तहसीलच्या पाठीमागे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी काही महिलांनी लावून धरल्यानंतर मंदिरासमोर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती पोलिस प्रशासन व मंदिर ट्रस्टींना झाल्यानंतर त्याठिकाणी त्यांनी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सदरील महिलांनी मंदिर प्रवेशाबाबतचे आंदोलन मागे घेतले.
शनिशिंगणापूरच्या मंदिराच्या चौथर्‍यावरून जाऊन युवतीने प्रवेश केल्याने यावरून राज्यभरात चर्चेला उत आले होते. याबाबत वादविवाद झाले होते. काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. जयंतीचे औचित्य साधून बीड शहरातील काही महिलांनी तहसीलच्या पाठीमागे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.  ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड.हेमाताई पिंपळेसह अन्य महिला जमा झाल्या होत्या. सदरील हनुमान मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागी त्यांनी लावून धरली. त्याठिकाणी मोठी गर्दी जमा झाल्याने याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी दाखल झाला. त्याचबरोबर ट्रस्टींसह काही भाविकही मंदिराच्या ठिकाणी दाखल झाले. मंदिर प्रवेशावरून वादविवाद होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून सदरील प्रकरण मिळवले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे महिलांनी मंदिर प्रवेशाबाबतचे आंदोलन मागे घेतले.