Breaking News

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा संपत्तीवर हक्क नाही- सर्वोच्च न्यायालय


 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 22 - पत्नीचा विवाहानंतर संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर म्हणजेच स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर एखाद्या महिलेचा लग्नानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर तिच्या संपत्तीवर तिच्या मुलांचा हक्क राहील. जर तिला मुले नसतील तर तिची ही संपत्ती तिच्या माहेरच्या मंडळींकडे दिली जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याच वेळी, पत्नीचा मृत्यू सामान्य परिस्थितीत झाला असेल तर पती-सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर दावा करू शकतात, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, लग्नानंतर तीन महिन्यांच्या आतमध्ये हुंड्यात मिळालेल्या सगळ्या वस्तू-पैसे वधूकडे सुपूर्द केले पाहिजे. पती किंवा सासरकडील मंडळींनी तिच्या चल-अचल संपत्ती तिच्याकडे सुपूर्द केली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. न्यायालयाने हा निर्णय याबाबत एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिला असून या प्रकरणात महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि तिच्या पतीने तिच्या संपत्तीवर दावा दाखल केला होता. ही संपत्ती तिच्या माहेरच्या मंडळींना न देता आपल्याला देण्यात यावी, अशी त्याची मागणी होती. या
व्यक्तीचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे.