Breaking News

कृषी अधिकारी जीजाजी मेहेरबान तर मजूर ‘साला’ करोडपती पहिलवान

 औरंगाबाद/प्रतिनिधी । 22 - जीजाजी मेहेरबान तर साला पहिलवान असा काहीसा अनुभव घेणारा तालुका कृषी अधिकार्‍यांच्या बायकोचा मजूरी करणारा भाऊ कागदोपत्री करोडोपती बनला आहे. प्रत्यक्षात घरात नाही दाणा अन बाजीराव म्हणा अशी परिस्थिती असणारा हा साला करोडपती असल्याचे पाहून समाज अवाक झाला आहे.
बायकोच्या भावाला कागदावर करोडोपती बनविण्याचा पराक्रम करणारा सिल्लोड तालुका कृषी अधिकारी मनोहर जाधव याने आपल्या मोलमजूरी करणार्‍या नातेवाईकांच्या नावावर अशा प्रकारे करोडोंची संपत्ती जमा केल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. जालना जिल्ह्यातील धामणगावचा प्रदिप गुलाबराव देवकर असे या नशिबवान मजूराचे नाव असून दाजी मनोहर जाधव याने कृषी खात्यातून कमावलेल्या हरामाच्या कमाईवर सेक्टर एन-8 सिडको येथे जवळपास दिड कोटीची तिन मजली इमारत मजूर साल्याच्या नावावर उभी केली आहे. एन.7 मध्ये शांती निवास नावाने आणखी एक बंगला असून त्याची किंमत एक कोटीहून अधिक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या शांती निवासमध्ये स्कोडा ही महागडी गाडी नेहमी उभी असते ती देखील मोलमजूरी करणार्‍या आणखी एका नातेवाईकाच्या नावावर असल्याचे समजते. आय-20 ही चारचाकी गाडीही या महाशयांकडे आहे. अशा प्रकारे भ्रष्टाचारातून कमावलेल्या कोट्यवधीतून बंगले, फ्लॅट, महागड्या गाड्या दारिद्ˆयात जीवन जगणार्‍या आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेऊन त्याचा उपभोग मात्र तालुका कृषी अधिकारी मनोहर जाधव स्वतः घेत आहे. (क्रमशः)
कृषी अधिकार्‍याची औकात नाही
गेल्या महिन्यात प्राप्त माहितीवरून दै. लोकमंथनने या कृषी अधिकार्‍याचे पितळ उघड केले होते. मनोहर जाधव नामक या भ्रष्ट अधिकार्‍याचा पर्दाफाश करण्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात वृत्त प्रसिध्द झाले नाही. त्याचाच फायदा घेऊन लोकमंथन मॅनेज केल्याचे विव्हळणे जाधवने सुरू केले होते. तथापि अशा भ्रष्ट प्रवृत्तीकडून मॅनेज होणे हा लोकमंथनचा पिंड नाही. या अधिकार्‍याची औकातही नाही.
लोकमंथनकडे आता पुरेसे पुरावे उपलब्ध झाले आहेत. जाधवच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी लोकमंथनने पुन्हा मालिका सुरू केली आहे.