Breaking News

अतिरिक्त मुख्य सचिवांचा नियोजनबध्द घाट -- सार्वजनिक बांधकाम : वार्धक्याची सोय पाहणार्‍यांना बढती; बदल्यांना वाट


 मुंबई/प्रतिनिधी । 19 - निवृत्तीपुर्वी बदली आणि बढती प्रकरणात मोठा हात मारण्याचा डाव अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी शिजविला असल्याची चर्चा साबांत आहे. मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास आणि साबांमंत्र्यांची दिसशाभूल करून कुलकर्णी यांची मोठी योजना कार्यरत होत असल्याचा बोलबाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या घोटाळ्यांमुळे चर्चेत येऊन वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून सप्तश्रृंगी फनीक्यूलर ट्रॉलीपर्यंतच्या अनेक घोटाळ्यांमुळे सचिवांपासून शाखा अभियंत्यांपर्यंत सहभागाचा ओघळ आला. त्यातच श्यामल मुखर्जी यांच्या कार्यकाळात झालेली बोगस नोकरभरती व त्यातून नाशिक जिल्ह्यातील होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरूणांची झालेली फसवणूक साबांच्या अवघ्या विश्‍वासार्हतेलाच कलंक लावून गेली. घोटाळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अन्य विभागात थोडाफार बदल झालेला जाणवत असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात मात्र सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडल्याचे चित्र दिसत  आहे. छगन भुजबळ यांच्याकडे जवळपास 10 वर्ष असलेले हे खाते चंद्रकांत पाटील यांच्या हातात आल्यानंतर या खात्याचा कारभार आमुलाग्र सुधारेल अशी आशा होती. कारभारी बदलला तरी काम करणारे हात पुर्वीचेच, भ्रष्ट तालमीत तावून सुलाखून निघालेले... चंद्रकांत पाटील यांना चकवा देणे त्यांना सहज शक्य होऊ लागले. अशातच साबांचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. आनंद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास संपादन केलेला असल्यामुळे साबांचे काम भरवशावर सुरू झाले. अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या कार्यकाळात साबांचा पदभार सांभाळण्यासाठी स्वतंत्र मंत्री आहे याचा विसर प्रशासनाला पडला. अशाच पध्दतीने सारे निर्णय होऊ लागले. श्यामल मुखर्जी यांच्या कार्याकाळातील सार्‍याच घोटाळ्यांना धोबीपछाड देऊन कुलकर्णींच्या काळात बेधडक निर्णयांचा विक्रम प्रस्थापित होऊ लागला. अन्य दैनंदिन कामकाजाबाबत मंत्र्यांना माहिती देण्याचे सातत्य राखणे शक्य नसले तरी बदली आणि बढती सारख्या महत्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती मंत्र्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र अतिरिक्त मुख्य सचिव आणि त्यांच्या हस्तक अभियंत्यांनी हे बंधन झुगारून आपल्या पातळीवर बदल्या आणि बढतीचे निर्णय अंमलात आणून दुकानदारी केली असे आरोप होत आहेत. आनंद कुलकर्णी हे जानेवारी अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ देणे शासनाच्या सेवेत पुन्हा सामावून घेत मुख्य सचिवपदावर नियुक्ती देणे अशा हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याच्या वावड्या मधल्या काळात उठल्या होत्या तथापि मुख्यमंत्र्यांनी स्वतःच खुलासा करून या अफवांचा धुराळा खाली बसविल्यानंतर आनंद कुलकर्णींच्या पदरात निराशा पडली आणि उरलेल्या सेवाकाळाचे चीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्याच निर्णयाचा एक भाग म्हणून अतिरिक्त मुख्य सचिवांनी बदली आणि बढतीचा एककलमी कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. येत्या 15 दिवसांत या कार्यक्रमाची शंभर टक्के अमलबजावणी करून वार्धक्याची सोय करण्याचा
त्यांचा मानस आहे. अशी वाच्यता साबांत आहे.