आपले आयुष्य मराठी वाचकांनीच समृद्ध केले ः अच्युत गोडबोले
पुणे (प्रतिनिधी) । 19 - आयुष्यातील चढउतार आणि आवडीचे विषय शब्दात उतरवून पुस्तकरुपात मराठी वाचकांपुढे सादर करणारे अमेरिकेतील मराठी उद्योजक आणि मराठी साहित्यप्रेमी लेखक श्रीनिवास ठाणेदार आणि साहित्य-कला-विज्ञान-सामाजिक शास्त्रांवर रंजक लिखाण करणारे अच्युत गोडबोले यांनी आपले आयुष्य मराठी वाचकांनीच समृद्ध केले, अशी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या लेखनातून वाचकांची आयुष्येही बदलली याची पावती वाचकांची हजारोंनी आलेली पत्रे, ई मेल आणि फोनवरुन मिळालेल्या प्रतिक्रियांनी दिली. यातून दोघांना मिळणारा दिलासा तितकाच प्रेरक आहे, असे या दोघांनी मान्य केले. 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या दोघांशी संवाद साधण्याचे काम पत्रकार उज्वला बर्वे यांनी केले. या तिघांचा सत्कार संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आणि डॉ. सोमनाथ पाटील उपस्थित होते.
ठाणेदार यांचे त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यावर आधारित असणारे ‘ही श्रीची इच्छा’ या आत्मपर पुस्तकाची 46 वी आवृत्ती संमेलनात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ठाणेदार, गोडबोले तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे संदीप वासलेकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पुस्तकांची विक्रमी विक्री होत असल्याचे इटकर यांनी जाहीर केले. अमेरिकेत जाण्यासाठी पाच वेळा व्हिसासाठी अर्ज करणारे ठाणेदार, तिथे रसायन शास्त्रात पीएचडी मिळवल्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू करताना येणार्या अडचणी, पत्नीचे निधन आणि अमेरिकेतील मंदीमुळे स्वत:चे उद्योग आणि संपत्ती विकण्याची त्यांच्यावर आलेली वेळ.
पुन्हा शून्यातून उभे राहत वयाच्या 55 व्या वर्षी परत स्वत:चा व्यवसाय नव्याने सुरू करीत उंचीवर नेणारे ठाणेदार यांनी मराठी तरुणांनी नोकरी न करता उद्योजक व्हावे, असा थेट संदेशच दिला. तसेच मराठी साहित्य, कला, नाटक यावर प्रेम करत अमेरिकेत मराठीतली संमेलने भरवणेही चालूच ठेवले. स्वत:ची फेरारी आणि रोल्स रॉईस अशा अलिशान गाड्या घेतलेले ते यशस्वी मराठी उद्योजक आणि लेखक बनले. तसेच ’ही श्रींची इच्छा’ या आत्मकथनाचा पुढचा भाग ते याच वर्षी प्रकाशित करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जी गोष्ट ठाणेदार यांची तीच अच्युत गोडबोले यांची. रसायनशास्त्रातील आयआयटी इंजिनिअरिंगची पदवी घेणार्या गोडबोले यांनी 23 वर्षात अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदांवर कामे केली. अनेक मोठ्या पदांवरील नोकर्यांच्या ऑफर्स नाकारत आपल्या जगण्याचे उद्दीष्ट असणार्या विविध विषयांवरील 15 हून अधिक मोठ्या ग्रंथांचे लेखन त्यांनी लोकप्रिय केले.
बालपणापासून आपल्या घरात विविध विषयांवरील चर्चा आणि संगीत क्षेत्रातील भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांचा संगीतमय सहवास लाभल्याने यावर भविष्यात काही वेगळे लिहावे ही इच्छा होती. मोठेपणी आयआयटी आणि अमेरिकेत अतिशय लोकोत्तर माणसे आणि त्यांचा अनेक विषयातील व्यासंग पाहिल्यावर आपण कोणीच नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली. हे सर्व अनुभव सहलेखकांच्या मदतीने लिहिताना सोपे गेले. सर्व प्रकारची कला आणि शास्त्रे किचकट भाषेऐवजी रंजक आणि कथा सांगितल्याप्रमाणे सोप्या भाषेत लिहिली आहे, असे गोडबोले म्हणाले. मुसाफिर या आत्मचरित्रा पाठोपाठ, व्यवस्थापन शास्त्रावरील बोर्डरूम, संगणकशास्त्रावरील कम्प्युटर, संगीतावरील नादब्रह्म, विज्ञानावरील किमयागार, अर्थशास्त्रावीरल अर्थात, मानसशास्त्रावरील मनात, चित्रकलेवरील झपुर्झा अशी एकापेक्षा एक लोकप्रिय पुस्तके लिहिली. या विविध विषयांवरील लेखन एका जिज्ञासू विद्यार्थ्याच्या भूमिकेतूनच मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. यातून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे, असे गोडबोले यांनी स्पष्ट केले.
आपले लेखन कदाचित समीक्षकांना दखल घेण्याजोगे वाटले नसेल, पण आपण हे वाचकाच्या जवळ जाऊन अतिशय सोप्या शैलीत मांडले असल्यामुळे त्यांना ते भावले आहे, असेही गोडबोले म्हणाले. जग बदलणारी अद्वितीय व्यक्ती, जग बदलून टाकणारी पुस्तके, मनोविकार आणि भारतीय अर्थशास्त्रावरील अनर्थ हे आपले पुढचे चार प्रकल्प असून ते लवकरच प्रसिद्ध होतील, असे गोडबोले यांनी सांगित
ले.
