Breaking News

ना. तुपकरांनी आरोग्य मंत्र्यांसमोर वाचला जिल्ह्यातील आरोग्य समस्यांचा पाढा


 बुलडाणा (प्रतिनिधीे) । 04 - जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची प्रचंड हेळसांड होत असून जनसामान्यांना आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील ढेपाळलेली आरोग्य यंत्रणा पाहता महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नुकतीच मुंबईत आरोग्य मंत्री दिपक सावंत यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी जानेवारीच्या दुसर्‍या आठवटयात बुलडाणा येथे प्रत्यक्ष भेट देण्याची ग्वाही यावेळी आरोग्य मंत्री ना.सावंत यांनी तुपकरांना दिली. 
जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळण्याऐवजी त्यांची हेळसांड होत आहे. 
रूग्णालयातील वार्डामध्ये गावठी डुक्कर रोज चकरा मारतात, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि रिक्त पदांमुळे जिल्हा रूग्णालय केवळ ‘रेफर टू’ पूरतेच मर्यादीत झाले आहे. अपंगाना दाखले मिळत नाही, सामान्य रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांना बाहेरून औषधी आणायला लावतात, काही डॉक्टर रूग्णांच्या नातेवाईकांडून उपचारासाठी पैशांची मागणी करतात, जिल्हा शल्य चिकित्सकांचे कुठलेच नियंत्रण नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहेत अशा विविध समस्या ना.तुपकरांनी आरोग्यमंत्री ना.सावंत यांच्यासमोर मांडल्या. या संदर्भातील निवेदन देखील त्यांनी दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयाचा कारभार ठिकाणावर आणण्यासाठी आवश्यक ती अपाययोजना राबवावी तसेच संबंधितांना तंबी द्यावी, अशी मागणी देखील ना.तुपकरांनी यावेळी 
केली. दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालय आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात बुलडाणा येथे भेट देउून प्रत्यक्ष पाहणी करू, अशी ग्वाही यावेळी ना.सावंत यांनी तुपकरांना दिली.