Breaking News

डॉ. श्रीपाल सबनीस यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरीतही ‘मॉर्निंगवॉक’


पिंपरी (प्रतिनिधी), 13 - सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना दिलेल्या अशा धमकीवजा सल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यापाठोपाठ पिंपरीमध्येही स्वराज अभियान आणि पिंपरी-चिंचवडमधील साहित्यप्रेमी, पुरोगामी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ‘मॉर्निंगवॉक’चे मंगळवार आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून एच. ए. मैदानापर्यंत (साहित्य संमेलन स्थळ) आज सकाळी आठ ते नऊ या वेळेत हा वॉक करण्यात आला. या मॉर्निंगवॉकमध्ये महाराष्ट्राच्या स्वराज अभियानाचे अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणि स्वराज अभियान, नागरी हक्क सुरक्षा समिती, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, डी. वाय. एफ. आय. पिंपरी-चिंचवड साहित्यप्रेमी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या मॉर्निंगवॉकला जातानाच झाली होती. त्यांच्या हत्येचा आरोप सनातनवर आहे. या पार्श्‍वभूमीवर संजीव पुनाळेकरांचा हा सल्ला म्हणजे अप्रत्यक्ष धमकीच आहे. त्यामुळे अशा सांस्कृतिक दहशतवादाला पुरोगामी आणि बुद्धीजीवी जनता घाबरत नाही, हे दाखवून देण्यासाठी या वॉकचे आयोजन करण्यात आले होते.