Breaking News

जळगाव मनपात विविध विभागाच्या चार समित्या

 जळगाव/प्रतिनिधी। 4 - जळगाव मनपा निर्मितीपासून रेंगाळलेला आकृतीबंधाचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी महापालिकेत विविध विभागांच्या चार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या समित्यांना आपला अहवाल सादर करावयाचा आहे. महापालिकेत असलेल्या व भविष्यात गरज भासणार्या कर्मचार्यांबाबतचा आकृतीबंध महापालिकेच्या निर्मितीपासून रेंगाळला होता. बर्याच वेळेस प्रयत्न होऊनही त्याला मुहूर्त लाभला नाही. मात्र शासनास आकृतीबंध सादर करावयाचा असल्याने आता त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 
या वेळी तांत्रिक, प्रशासकीय, लेखा व आरोग्य अशा चार समित्या गठित करण्यात आल्या. तांत्रिक समितीचे प्रमुख शहर अभियंता सुनील भोळे, प्रशासकीय समितीचे प्रमुख प्रदीप जगताप, लेखा समितीचे प्रमुख सुभाष भोर तर आरोग्य समितीचे प्रमुख उदय पाटील हे असतील. या चौघांना विहित नमुन्यात आपापल्या क्षेत्रातील अहवाल तयार करून तो आठ दिवसात आयुक्तांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर तो शासनास सादर होईल. आयुक्तांकडे बैठक शनिवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. उपायुक्त प्रदीप जगताप, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, नगररचनाकार चंद्रकांत निकम, आरोग्याधिकारी उदय पाटील व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. महापालिकेच्या अस्थापनेवर सध्या 2037 कर्मचारी आहेत. 30 वर्षांचे नियोजन करून संगणकीकरणासह विविध बाबींचा अभ्यास करून किती कर्मचार्यांची आवश्यकता असेल, याचा अहवाल तयार करावयाचा आहे.