जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत
तासगांव, दि. 20 - गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून त्याचा फटका द्राक्षांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनला असून द्राक्षावर भुरी रोगाची शक्यता असल्याने मत द्राक्षतज्ञांनी व्यक्त केले आहे. तासगाव तालुक्यात द्राक्षाचा काढणी हंगाम चालू असून 40 टक्के द्राक्ष काढले आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. सतत ढगाळ वातावरणात राहिल्यास भुरीची शक्यता आहे. उन पडले नाही तर मण्याला तडे जातात त्यासाठी पोटॅशयुक्त खते द्यावीत.
तासगाव तालुक्यात महिन्याभरापासून द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत छाटणी घेतलेल्या 40 टक्के द्राक्षबागा आहेत. या दोन महिन्यात छाटणी घेतलेल्या बागांतील द्राक्षांची काढणी अंतिम टप्प्यात आहे.
मात्र ऑक्टोबरपासून पुढे छाटणी झालेल्या द्राक्षबागांना अद्याप मार्केटची प्रतीक्षा आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्यामुळे याचा फटका द्राक्षबागांना बसण्याची चिन्हे दिसत आहे. विशेषत: नोव्हेंबर महिन्यानंतर पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना भुरी रोगाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामान आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी व्यक्त केला आहे. ढगाळ हवामान कायम राहिल्यास द्राक्षांना तडे जाण्याचीही शक्यता आहे. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षाला बसू नये, यासाठी द्राक्ष बागायतदारांकडून पुन्हा औषध फवारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. द्राक्ष बागाय तदार शेतकर्यांनी ढगाळ हवामानाला घाबरुन न जाता, तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आर्वे यांनी केले आहे.