Breaking News

आपल्या देशाचा प्रश्‍न विचारभिन्नतेचा नसून विचार शून्यतेचा आहे ः गडकरी

 पुणे (प्रतिनिधी) । 20 -  आपल्या देशाचा प्रश्‍न विचारभिन्नतेचा नसून विचार शून्यतेचा आहे. आपल्या समाजातील लोक डावे किंवा उजवे नसून प्रवाहाबरोबर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र समाज प्रगतीसाठी स्वतंत्र विचाराची गरज आहे, असे मत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 89 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे यांनी गायलेल्या गीतांनी निरोप समारंभाचा आरंभ झाला. यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील म्हणाले की, निरोप देताना अंतःकरण जड झाले आहे.
एवढे मोठे संमेलन फक्त मराठी माणसेच भरवू शकतात.  कमी शब्दात वेदना मांडण्याचे सामर्थ्य साहित्यातच असते, त्यामुळे साहित्याकडे केवळ करमणूक म्हणून पाहू नका. देश बदलतोय, या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर उमटत असते आणि हा बदल नव्या पिढीत रुजवण्याचे काम साहित्य करत असते. थोरांच्या विचारातून व त्यांच्या साहित्यातून जो समाज घडणार आहे त्यावरच भारताचे भविष्य ठरणार आहे. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे एक विचार आहे त्याला साहित्याने प्रोस्ताहन देणे गरजेचे आहे.
साहित्य क्षेत्रात देशामध्ये महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालच पुढे आहे. शेती, उद्योग, कला, संस्कृती याच बरोबर समन्वय साधले तरच देश सर्वांगीण विकास होऊ शकतो. सत्ता फक्त डोळे नष्ट करू शकते मात्र डोळ्यामागील विचार व इतिहास नष्ट करू शकत नाही.
सोहळा व्यवस्थित पार पडेपर्यंत वाकण्याचा (चूक नसतानाही माफी मागण्याचा) निश्‍चय केला होता, आज सोहळा यशस्वीपणे पार पडला याचे समाधान वाटत आहे, असे मत पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले. संमेलनाचे आयोजन हे वधुपक्षाप्रमाणे असते, त्यामुळे कंबर दुखत असली तरीही वाकून माफी मागावीच लागते, असेही ते यावेळी म्हणाले. वाद, मतभेद हा सार्वजनिक कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे, त्याची झळ आम्हालाही आहे. आम्ही निंदकांचेही ऋणी आहोत, असेही पी. डी. पाटील पुढे म्हणाले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, सर्वोच्च पुस्तक विक्री झाल्याचे ऐकून मला आनंद झाला. साहित्यिकाला अनुदान मिळण्यासाठी त्याला मंत्रालयाच्या पायर्‍या झिझवाव्या लागणार नाहीत, दसर्‍या आधी त्यांना निधी मिळेल असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. यापुढे राज्यात सर्वत्र कमी दरात संमेलनाला जागा मिळेल. जी महापालिका त्यांना अशी जागा देणार नाही, तिचे नाव कळवा, मी पुढे बघतो, असेही तावडे यांनी ठणकावून सांगितले.