Breaking News

माजी राष्ट्रपतींच्या मुलीचा प्रताप !


 पुणे (प्रतिनिधी) । 20 -  कायमच या-ना त्या कारणावरून चर्चेत राहिलेले माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या बोहर्‍यात सापडले आहे. यावेळेस त्यांची कन्या ज्योती शेखावत अध्यक्ष असलेल्या महिला उन्नती उद्यम ट्रस्टला मुळशी तालुक्यातील जांबे गावात देऊ केलेल्या 20 एकर गायरानावरील वृक्षतोडीस महसूल अधिकार्‍यांच्या संगनमताने सुरवात करण्यात आली आहे. त्या भूखंडावर सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या हजारो वृक्षांची गेल्या काही रात्रींमध्ये कत्तल करण्याचे काम या संस्थेमार्फत सुरु आहे.
महसूल विभागाने ही झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. गायरानावरील वृक्ष तोडून भूखंड संस्था संघटनेच्या घशात घालणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी संस्थांकडून करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने तब्बल 15 ते 20 वर्ष ही झाडे जोपासली. 
जांबे येथील सर्वे नंबर 141 मध्ये सुमारे 40 एकर जागा सरकारी गायरानसाठी राखीव होती.त्यापैकी 20 एकर जागा भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची कन्या ज्योती शेखावत अध्यक्ष असलेल्या महिला उन्नती उद्यम ट्रस्टला देण्यात आली . तर 10 एकर जागेचा भूखंड माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीला देण्यात आल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. 
प्रतिभा पाटील यांच्या निवासस्थानाच्या भूखंडाचा वाद, निवडणुक काळात त्यांच्या मुलाच्या प्रचारातील वाद कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. आता या प्रकरणात शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.