सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंढेंना जिवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर, 14 - वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाई करणारे सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मुंढे, तलाठी व काही कर्मचारी कुर्डुवाडी- शेटफळ रस्त्यावर गस्त घालत होते. लऊळ (ता. माढा) येथे वाळू वाहतूक करणार्या एका ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न मुंढेंनी केला. मात्र या चालकाने त्यांच्या अंगावरच ट्रक घालण्याचा प्रयत्न करून पळ काढला. पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. याबाबत तलाठी मल्लिनाथ बंड्या स्वामी यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून त्यावरून ट्रकचालकाविरोधात सरकारी कर्मचार्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
राजकुमार कोळी, राजेंद्र चव्हाण (पिंपळनेर), नागनाथ देवकर (भूताष्ठे) आणि शीतल अवताडे (पडसाळी) या चार तलाठ्यांसमवेत फिर्यादी स्वामी हे गस्त घालत होते. त्या वेळी लऊळ हद्दीतील ढोरे वस्तीजवळ शेटफळहून कुर्डुवाडीकडे जाणारा वाळूचा ट्रक (एमएच 12 सीएच 1167) भरधाव जात होता. गस्त पथकाने चालकास ट्रक कडेला थांबवण्यासाठी इशारा केला. मात्र त्याने पथकाची सूचना धुडकावून थेट कर्मचार्यांच्या अंगावरच ट्रक घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर पथकाने तातडीने तहसीलदारांच्या वाहनातून (एमएच 45 डी 0038) ट्रकचालकाचा पाठलाग केला व त्याला रोखले. ट्रकचा चालक सचिन भुजंग मिसाळ (वय 27, रा. शिरसाव, ता.परंडा, जि.उस्मानाबाद) याच्याकडे वाळू रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली. मात्र तो देऊ शकला नाही. त्यावरून त्याच्या ट्रकमधून बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने पंचनामा केला असता या ट्रकमध्ये 22 हजार 500 रुपये किमतीची साडेचार ब्रास चोरीची वाळू आढळली. ट्रक अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामकाजात अडथळा केल्याचा गुन्हा मिसाळवर दाखल केला आहे.
