वनसंपदा हडपण्याला मुनगंटीवारांची साथ, नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई, प्रतिनिधी, दि. 23 - भाजप सरकार देशात जिथे तिथे रामदेव बाबांसाठी लाल गालीचा पसरून त्यांना हवी तशी मदत करत आहे. आता बाबांचा महाराष्ट्रातील वनसंपदा हडप करण्याचा डाव असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांना मदत करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी भवन येथे काल प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्त्ते नवाब मलिक यांनी रामदेव बाबांची पतंजली कंपनी व वनमंत्र्यांमध्ये साटेलोट झाल्याचाही ठपका ठेवला. मात्र, भारतात आयुर्वेदिक उत्पादने करणार्या डाबर, झंडू, विकोसारख्या कंपन्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. अशा नामांकित कंपन्यांचा विचार न करता भाजपचे पाठीराखे असणार्या रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्व नियम डावलून मदत केली जात आहे, हे साफ चुकीचे असल्याचे मलिक म्हणाले.
राज्यातील 20 टक्के जंगलातील वनसंपदा पतंजलीला रामदेव बाबांच्या प्रेमापोटी कुठलीही निविदा न काढता दिली जात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हे होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यात, विधीमंडळात विरोध करू, शिवाय न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात येतील. मलिक यांनी या वेळी मुनगंटीवारांची तुलना मोगलीशी केली. मोगलीचा जंगलात जसा सर्वत्र संचार सुरू असे, तसेच मुनगंटीवारांचे सुरू आहे. मात्र संचार करा, पण जंगल तुम्ही कोणाला आंदण देऊ शकत नाही, असे मलिक म्हणाले. बापटांचा मुलगाच खाती चालवतो: अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व त्यांचा मुलगा सध्या जपानच्या दौर्यावर आहेत. बापटांच्या मुलाचा सर्वत्र
संचार आता या राज्याला नवा राहिलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा तसेच औषध प्रशासन ही बापट यांची खाती त्यांचा मुलगाच चालवत असल्याचाही आरोप मलिक यांनी केला.
भाजपकडून शिवसेनेचे खच्चीकरण
सत्तेत अल्प वाटा देऊन भाजपने शिवसेनेला खाली मान घालायला लावली आहे. आता संधी मिळेल तेथे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होऊ शकत नाही, हे माहीत असूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला मुद्दामहून परवानगी दिली. आता इतके दिवस होऊनही काही होत नसल्याचे पाहिल्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्मारकाची आठवण करून देत आहेत. स्मारक तेथे होणारच नसल्याने फडणवीस या पत्राला उत्तर देऊ शकत नाही. एकूणच भाजप शिवसेनेला खेळवत असल्याचा टोला मलिक यांनी लगावला.