Breaking News

दुधाळ जनावरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 बुलडाणा (प्रतिनिधी) । 10 - जिल्हा परिषद अंतर्गत अनु.जमातीसाठी  आदिवासी उपयोजने अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदानावर प्राप्त तरतुदीस अधिन राहुन 65 लाभार्थ्याकरीता दुधाळ जनावरांचा गट वाटप करावयाचा आहे. तसेच 36 लाभार्थ्यांकरीता शेळी गट वाटप करावयाचे आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु झाल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती सुलोचनाताई शरदचंद्र पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.सी. पसरटे यांनी दिली आहे. सदर योजनेच्या अर्जाचा नमुना पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसर्‍या नमुन्यातील अर्ज स्विकारण्यात येणार नाही. मागील वर्षी ज्या लाभार्थ्याने अर्ज सादर केलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज सादर करावा. सदर योजने अंतर्गत 8 जानेवारी 2016 पासुन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी 2016 ही राहील. या दिनांकानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 
दुधाळ जनावरे/शेळी गटासाठी एका  कुटुंबातुन फक्त एकाच लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे, अर्जदार अनु.जमाती प्रवर्गाचा व दारिद्र रेषेखालील असावा, योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग अर्जदारांचा समावेश असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीने यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा, सदर योजना 75 टक्के शसकीय अनुदान व 25 टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरुपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याच बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे. तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, अर्जासोबत नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो लावावा. वरील निकष पूर्ण करणार्‍या इच्छूकांनी कोणत्याच दलाला मार्फत किंवा खाजगी व्यक्तिमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.  असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रशासनाच्या वतीने कळविले आहे.