Breaking News

अनुसूचित जमाती समिती 13 पासून जळगाव जिल्हा दौर्‍यावर



 जळगाव/प्रतिनिधी। 6 -  गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या आढाव्यासाठी संबंधित समिती या आठवड्यात जिल्ह्यात येणार होती. परंतु ती आता 13 ते 15 जानेवारीदरम्यान येणार आहे. आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली खानदेशातील तिघांसह राज्यातील 15 आमदारांचा यात समावेश असून, चार वरिष्ठ अधिकारीही त्यात आहेत. 
जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत राबविलेल्या विविध योजना, भरती, बढती आदींबाबत समिती संबंधित अधिकार्‍यांकडून त्या आशयाचा आढावा घेणार आहे. अगोदर ही समिती 6 ते 8 जानेवारीदरम्यान येणार होती, पण ती आता या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात येणार आहे. समितीत खानदेशातील आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (चोपडा), चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार), काशिराम पावरा (शिरपूर) यांच्यासह राज्यातील  आमदार असून, इतर चार वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांचाही समावेश आहे. संबंधित समितीचे सदस्य विविध कार्यालयांत जाऊन गेल्या तीन वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेत खर्चिक व अखर्चिक निधी, अंमलबजावणी किती झाली, त्यातील अडचणींबाबत संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करतील. 
यात जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा बँक, वीज वितरण कँपनी, परिवहन महामंडळात बैठका घेत अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांची भरती, बढती, अनुशेष आदींबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून त्याचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्यातील काही कामांना समितीचे सदस्य प्रत्येक भेटी देऊन पाहणीही करणार आहेत.