Breaking News

शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान तत्काळ जमा करा - । व्हिडीओ कॉन्फरन्िंंसगद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश


 अहमदनगर । प्रतिनिधी । 22 - खरीप हंगामातील अनुदान तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे प्रशासनाला दिले आहेत. 
जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, कृषीअधीक्षक अंकुश माने यावेळी उपस्थित होते. सरकारने खरीपासाठी वितरीत केलेल्या अनुदानावर यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना अनुदान वाटप झाले, अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. त्यावर जिल्हा प्रशासनही निरुत्तर झाले. अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यासाठी खरीपाचे अनुदान वितरीत होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. अनुदान वाटपात नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 
नगर जिल्ह्यातील 581 गावांतील खरीपाचे 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. अपुर्या पावसाअभावी पिके वाया गेली. त्यावर झालेला खर्चही वसूल झाला नाही. त्याबदल्यात सरकारकडून अनुदान देण्यात आले. 
खरीप वाया गेलेल्या शेतकर्यांसाठी सरकारकडून पहिल्या टप्प्यात 93 कोटी प्राप्त झाले आहेत. निधी वाटपासाठी कालबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी तशा सूचनाही जिल्हा प्रशासनास केल्या. अनुदान वाटपासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत करण्यात आली. या समितीमार्फत निधी वाटपाचे नियोजनही करण्यात आले. पण, तालुकास्तरावरील यंत्रणेकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. अनुदान वाटपाची प्रक्रिया गोगलगायीच्या गतिप्रमाणे सुरू आहे. खरीप अनुदान वाटपासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे, लाभार्थी शेतकर्यांच्या अद्याक्षरानुसार याद्या तयार करणे, तयार याद्यांची खातरजमा करणे, अंतिम याद्या तयार करून त्या गावातील चावडीवर प्रसिद्ध करणे, धनादेश संबंधित बँकेत जमा करणे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. खर्चित अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी आहे. त्यापूर्वी अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. अनुदान वाटपाचे नियोजन कोलमडल्याने शेतकर्‍यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. 
जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये घेतलेल्या गावातील सर्व कामे 31 मार्च अखेर पुर्ण करावेत, तसेच गावनिहाय नियोजन व काम पुर्ण करण्यासाठी कालबध्द आराखडा करावा, 2016-17 साठी निवडण्यात येणार्‍या गावांची माहितीही त्यांनी घेतली. जलयुक्तसाठी उपलब्ध झालेला निधी व त्यासाठी खर्च झालेला निधी याचाही आढावा घेऊन त्यांनी सुचना केल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजूरांची कामावरील सद्य उपस्थिती वाढवावी. जलयुक्तच्या कामात रोहयो मार्फत कामांना प्राधान्य द्यावे आदीबाबत त्यांनी निर्देश दिले आहे.