Breaking News

टंचाईग्रस्त गावात जलयुक्त शिवार अभियान

 अहमदनगर । प्रतिनिधी । 22 - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात 279 गावांत हे अभियान राबविण्यात आले. आगामी 2016-17 साठी नगर जिल्ह्यासाठी 264 गावांचे उद्दिष्ट निश्‍चित झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने गावांची निवड केली होती. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव बैठकीत सादरही केला. मात्र, गावे निवडताना स्थानिक लोकप्रनिधींना विश्‍वासात घेतले जात नाही. परस्पर गावांची निवड होते, अशी तक्रार करत लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊनच गावांची निवड करावी, अशी मागणी आमदारांनी केली. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी गावे निवडीला स्थगिती दिली. सुधारीत आराखडा तयार करण्याआधी तहसीलदारांनी स्थानिक आमदारांशी चर्चा केली. गावांची यादी आमदारांना दाखविली. त्यांच्याशी चर्चा करून गावे अंतिम करण्यात आली आहेत. त्यामुळे अभियानाचा मार्ग मोकळा झाला आहे. . 
निवड केलेल्या 264 गावांत प्रजासत्ताक दिनी जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. अभियानासाठी स्वतंत्र निधी नाही, निधीची चणचण आहे. त्यामुळे ’जलयुक्त’साठी निवडलेल्या गावांत रोहयोंतर्गत तलावातील गाळ काढणे, शेततळे, यांसारख्या कामांना सुरुवात होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गावांत शिवार फेरी काढली जाईल. शिवार फेरी घेऊन प्रत्येक गावचा जलआराखडा तयार करण्यात येईल. अंतिम मंजुरीसाठी आराखडा ग्रामसभेत सादर केला जाणार आहे. गावात जलसंधारणाची कोणती कामे करायची, ते ठरविण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे.गावाने सुचविलेली कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात येतील. त्यासाठी वेगळा निधी दिला जाणार नाही. या कामांत लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभाग असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेऊन जलयुक्त शिवार अभियानावर चर्चा होणे अपेक्षित आहे. लोकसहभागातून किमान 10 लाखांची कामे करणार्या गावांत जलयुक्त शिवार अभियानाचा निधी वितरीत केला जाणार आहे.