Breaking News

संस्कृती व देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मातृभाषा येणे आवश्यक


सांगली, 18 - इंग्रजी ही रोजगाराची भाषा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या भाषेशिवाय आपले कौशल्य दाखविणे अशक्य असले तरी आपली संस्कृती देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मातृभाषा येणे हे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. 
मिरज-पंढरपूर रोड वरील मालगाव हद्दीत दास बहुउद्देशीय विश्‍वस्थ संस्था यांच्या वतीने उभारण्यात येणार्‍या दास व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर व आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे पब्लिक स्कूल भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.
 शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे पुढे म्हणाले, शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आदर्श व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी उच्च शिक्षणापेक्षा कौशल्यपूर्ण शिक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त होत आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने कौशल्यपूर्ण शिक्षणावर येत्या काळात अधिक भर देण्यात येणार आहे. 
कौशल्यपूर्ण शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राज्य पातळीवर तयार करण्याची कार्यवाही सुरु असून विद्यार्थ्याला स्वंयपूर्ण बनविण्यासाठी व्यावसायभिमूख शिक्षण देण्यावर भर देण्यात येईल.
या कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, शांताराम गरुड, मकरंद देशपांडे, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.