देशात राहूनही देशाचे नियम न पाळणारे देशद्रोही ः राहुल सोलापूरकर
पुणे (प्रतिनिधी), 18 - आपल्या देशात राहून जे देशाचे नियम पाळत नाहीत, ते देशद्रोही आहे. केवळ रस्तासुरक्षा सप्ताह असेपर्यंत नियम पाळणे मर्यादित न ठेवता, वर्षभर ते पाळायला पाहिजेत, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या अपघात मित्र कार्यक्रमात व्यक्त केले. प्रादेशिक परिहवन विभाग, पुणे आणि लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेन्द्र पाटिल, प्रादेशिक परिवहन उपाधिकारी अनिल पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक सारंग आव्हाड, डॉ. श्रीकृष्ण जोशी, कल्याण रमण आदी उपस्थित होते.
यावेळी सोलापूरकर यांनी स्वतःच्या अपघाताबाबत अनुभव कथन केले. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, आपली कोणतीही चूक नसताना समोरच्याच्या चुकीमुळे अपघात झाला, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यामुळे त्यांच्या कामातही व्यत्यय आल्याने वेळ वाया गेला. माझ्या एकट्याच्या अपघाताने एवढा वेळ वाया जाऊ शकतो तर राष्ट्रीय पातळीवर किती वेळ वाया जात असेल, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. लोकमान्य हॉस्पिटलसारख्या संस्था अपघातग्रस्तांसाठी अत्यंत मोलाचे काम करीत आहेत. त्यांचा आदर्श इतर संस्थांनीही घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले की, अपघाताला कोणतीही जात आणि धर्म नसतो, अपघात नेते-अभिनेते कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या तातडीच्या वैद्यकीय सेवेची संपूर्ण माहिती देऊन अपघातग्रस्त रुग्णांना पहिल्या तासाभरात मिळणारी मदत त्यांचे प्राण वाचवण्यास उपयुक्त ठरु शकते, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
कल्याण रमण यांनी हेल्मेटचा वापर करण्याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले. हेल्मेट विकत घेताना आपण जास्त काळजी घेत नाही, ज्यामुळे आपण चुकीच्या हेल्मेटचा वापर करतो. हेल्मेट विकत घेताना हेल्मेट डोक्यात घालून ते व्यवस्थित बसते की नाही हे तपासून घ्यायला हवे. बर्याच वेळा सैल हेल्मेट घातल्याने डोक्याला मार लागण्याचा धोका असतो. त्याने जखम होऊ शकते, असे रमण यांनी सांगितले. लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी डॉ. जयंत श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त रुग्णांना कशा प्रकारे मदत करायची, व्यवस्थित प्राथमिक उपचार कसे द्यायचे आणि हॉस्पिटलपर्यंत कसे पोहोचवायचे याबद्दल प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले. तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी त्वरीत रुग्णवाहिकेला बोलवणे गरजेचे आहे, हेही सांगितले. यावेळी हेल्मेटचा वापर कसा करावा आणि रस्तेसुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अपघातातील मृतांना यावेळी श्रद्धाजंली वाहण्यात आली. 500 मेणबत्ती प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.