मानसरोवर यात्रेला लवकरच सबसिडी मिळणार : अर्थमंत्री
मुंबई, प्रतिनिधी, दि. 8 - हज यात्रेसाठी ज्याप्रमाणे राज्यातील मुस्लिमांना सबसिडी दिली जाते त्याच धर्तीवर आता कैलास मानसरोवर यात्रेस जाणार्या यात्रेकरूंनाही सबसिडी दिली जाणार आहे. याबाबतचा आदेश एका महिन्यात काढला जाईल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे वित्तमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी सबसिडीचे आश्वासन दिले.
कैलास मानसरोवर यात्रेला जाणार्या यात्रेकरूंना इतर राज्ये सबसिडी देतात. राजस्थान सरकार सर्वात जास्त म्हणजे एक लाख रुपये, तर उत्तर प्रदेश सरकार 25 हजार रुपये प्रति यात्रेकरू सबसिडी देत आहे. दिल्ली, कर्नाटक, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश उत्तराखंड या राज्यांकडूनदेखील कैलास मानसरोवर यात्रेसाठी सबसिडी दिली जाते. मात्र, राज्य सरकार यासाठी सबसिडी देत नव्हते. आमदार लोढाही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होते. लोढा यांनी बुधवारी वित्तमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सबसिडी देण्याची मागणी केली. वित्तमंत्र्यांनी लगेचच ही मागणी मान्य केली.