दहशतवाद निषेध रॅलीमध्ये पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे (प्रतिनिधी) । 19 - दहशतवादविरोधी पथकाचे एसीपी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अशा आशयाचा ई-मेल आयसीस या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना आल्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील तरुणाईने दहशतवाद निषेध रॅली काढली. त्याला पुणेकर व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढणारे बर्गे साहेबांसारखे धडाकेबाज अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना जर दहशतवादी धमकावणार असतील तर हे अधिकारी किवा पोलिस कर्मचारी एकटे नाहीत तर त्यांच्या पाठीशी सर्व नागरिक ठामपणे उभे आहेत हे दाखवून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करणायात आले होते.
आज सकाळी बालगंधर्व चौकात मोठया प्रमाणावर नागरिक येण्यास सुरुवात झाली. सर्वपक्षाचे व सर्व धर्माचे नागरिक दहशतवादाविरुद्ध एकजुटता दाखवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले. खा.वंदना चव्हाण, आ.माधुरी मिसाळ, आ.मेधा कुलकर्णी, आ.जगदीश मुळीक, कोंग्रेस चे शहराध्यक्ष अभय छाजेड, मोहनदादा जोशी, आर.पी.आय चे शहराध्यक्ष महेंद्र कांवळे, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, नगरसेवक दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, मानसी देशपांडे, मुक्ता टिळक, मनीषा चोरबेले, दत्ता खाडे, मनसे चे किशोर शिंदे, रविंद्र धंगेकर, सुशीला नेटके, पुष्पाताई कनोजिया, बाळासाहेब शेडगे, राजु पवार, शिक्षण मंडळ सदस्य मंजुश्री खर्डेकर, रवी चौधरी यासह अनेक मान्यवर आणि नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर कृष्णा यादव यांनी तयार केलेल्या समईतील दीप प्रज्वलित करुन या मूक मोर्चास प्रारंभ करण्यात आला.यावेळी संयोजक संदीप खर्डेकर, प्रशांत कनोजिया यांच्यासह बाबाशेठ मिसाळ, बाबा शेख, इकबाल शेख, कादर शेख, मेहबुब शेख उपस्थित होते. या मूक मोर्चाचा समारोप सावरकर स्मारक येथे करण्यात आला. यावेळी आ.मेधा कुलकर्णी, आ.माधुरी मिसाळ, मा.विनायक निम्हण, आ.जगदीश मुळिक, पुष्पाताई कनोजिया, हिंदकेसरी अमोल बुचडे यानी आपले मनोगत केले. दहशतवादाविरुद्ध च्या लढयात सर्व पुणेकर एकदिलाने ठामपणे उभे आहेत अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक संदीप खर्डेकर यानी केले तर आभार व समारोप प्रशांत कनोजिया यानी केले.