डीपीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे (प्रतिनिधी) । 19 - राज्य शासनाने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या विकास आराखड्यामुळे शहराचे नुकसान होणार आहे. या विकास आराखड्याच्या विरोधात पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाने बालगंधर्व चौकात आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक अभय छाजेड, आमदार दीप्ती चवधरी, माजी आमदार बापू पठारे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे म्हणाले की, राज्य शासनाच्या त्रिस्तरीय समितीने मोठ्या प्रमाणावर नागरी हितीचे आरक्षणे उठविली आहेत. याची दखल राज्य शासनाने लवकरात लवकर घ्यावी. अन्यथा या पुढील काळात शहरातील भाजपा आमदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा ईशारा देखील त्यानी यावेळी दिला. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक अभय छाजेड म्हणाले की, पुणे शहराचा भविष्याचा विचार राज्य सरकारच्या त्रिस्तरीय समितीने डीपीमध्ये विचार घेतला गेल नाही. यामुळे पुणे शहराला बकालपणा येण्याची शक्यता असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.