Breaking News

अटी मान्य करा; 15 मिनिटांत जीएसटी मंजूर होईल


मुंबई, प्रतिनिधी, दि. 18 -  काँग्रेसने घातलेल्या अटी मोदी सरकारने मान्य केल्या तर आमच्या पाठिंब्याने संसदेत अवघ्या पंधरा मिनिटांत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर होईल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मुंबईत व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना राहुल म्हणाले की, जीएसटी विधेयकावर मोदी सरकारशी समझोता शक्य आहे. परंतु त्यासाठी टेबलावर समोरासमोर बसावे लागेल तरच ते शक्य आहे. मात्र मोदी सरकार त्याबद्दल विचारच करत नाही. मोदी सरकार ज्या दिवशी आमच्या अटी मान्य करेल, त्या दिवशी आम्ही अवघ्या 15 मिनिटांत जीएसटी मंजूर करू. काँग्रेसनेच जीएसटी विधेयक मांडले होते. तेव्हा भाजपने ते सात वर्षे संसदेत लटकवून ठेवले. तेव्हा जेटलींनी आणि गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नव्हते. जीएसटी चांगले आहे, हे जेटलींनी मला सांगण्याची गरजच नाही. ते चांगलेच आहे, असे राहुल म्हणाले.
सत्तेचे केंद्रीकरण हीच मोठी समस्या 
सत्तेचे प्रचंड केंद्रीकरण ही सध्या देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येक गोष्टीबाबत तीन, चार किंवा पाच-सहा व्यक्तींकडून निर्णय घेतले जात आहेत. सत्तेचे केंद्रीकरण करून तुम्ही समस्या सोडवू शकत नाहीत, असे ते म्हणाले.
स्टार्टअप व असहिष्णुता एकाच वेळी कसे?
राहुल म्हणाले, स्टार्टअपला चालना देणे आणि असहिष्णुता बाळगणे हा विरोधाभास आहे. स्टार्टअप कंपन्यांना मुक्त विचारप्रवाहाची गरज आहे; परंतु संघाचा भारताविषयीचा दृष्टिकोन लवचिक नाही. देशाला, मुक्त, प्रवाही विचारांची गरज आहे. मला स्टार्टअप हवे आहे; पण मी असहिष्णुताही बाळगेन, असे म्हणणे विरोधाभास आहे. तुम्ही असहिष्णू असाल तर अर्थव्यवस्था व स्टार्टअपच्या आघाडीवर अपयशी व्हाल.