Breaking News

परंपरेला नवतेची जोड दिली तरच कला टीकेल-चंद्रकांत कुलकर्णी


परभणी, दि.04 - मराठवाड्यातील लोककला या पारंपरिक लोकसंस्कृतीचा अविष्कार करतात. पण या परंपरेला नवतेची जोड मिळायला हवी. परंपरा कुठपर्यंत बाळगायची आणि नवतेचा प्रारंभ कुठून करायचा याचा विवेक कलावंताकडेही असला पाहिजे. परंपरेला नवतेची जोड मिळाली तरच कलेचे महत्व अधिक ठसते. असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. 
प्रतिवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘परभणी भूषण 2015’ हा पुरस्कार गोंधळमहर्षि राधाकृष्ण कदम यांना आज श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (दि.01) सायंकाळी सात वाजता पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.राहुल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संयोजक अ‍ॅड.रमेशराव गोळेगावकर, देविदास कुलकर्णी, आसाराम लोमटे, गुलाबराव कदम यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री.कुलकर्णी म्हणाले, मला परभणीचा सार्थ अभिमान आहे. परभणीचेे पाणी ज्याने चाखले त्यास कुणाचीही भिती नाही. परभणीची संस्कृती आणि शेती किती महत्वाची आहे हे त्यांनी आपल्या बोलण्यातून अधोरेखीत केले. परभणीला सांस्कृतिक, साहित्यीक आणि क्रांतीची मोठी परंपरा आहे. या परंपरेचा प्रत्येकालाच अभिमान असला पाहिजे. त्यातील कस घेवून पुढे चालले पाहिजे. परभणीची गोंधळ कला ही सातासमुद्रापार पोहोचलेलाच आहे. परंतू आज या 
कलेचा परभणीकरांच्यावतीने सन्मान झाला असेही त्यांनी सांगितले. परभणीच्या माणसाला प्रतिकूल परिस्थितीची भिती दाखवू  नका, आम्हाला आव्हान देवू नका असे सांगत परभणीकरांचा दबदब्याचे वर्णन केले. चित्रपटामध्ये चमत्कार नकोत, पुरोगामी विचार असले पाहिजे. माझ्या चित्रपटात माणूस दोन पावले पुढे जाईल असेच विचार राहतील. असे म्हणत जाती व्यवस्थेवर आपला विश्‍वास नसून सर्व माणूस एकच आहे असा मौलिक विचार त्यांनी सांगितला. यावेळी बोलतांना आ.पाटील म्हणाले, तपस्वी व्यक्तिमत्वाचा गौरव आज येथे झाला. परभणीत गोंधळसम्राट कै.राजारामबापु कदम यांच्या नावाने  गोंधळ प्रशिक्षण अकॅडमी स्थापन केली पाहिजे त्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून अकरा लाख रुपये देण्याचे आ.पाटील यांनी जाहीर केले.परभणीच्या विकासासाठी आपला सदैव प्रयत्न राहणार असून भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय, क्रिडा हब आणि नाट्यगृह याची उभारणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ.लोमटे यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चव्हाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार अ‍ॅड.गोळेगावकर यांनी मानले.