Breaking News

स्वामिनाथन आयोगासाठी जनजागृती प्रसंगी पंतप्रधानांच्या कार्यालयातही घुसू ः आ.बच्चू कडू

 स्वामिनाथन आयोगासाठी जनजागृती प्रसंगी पंतप्रधानांच्या कार्यालयातही घुसू ः आ.बच्चू कडू
 बुलडाणा (प्रतिनिधी) । 19 - मागील शासनाच्या काळात स्वामिनाथन आयोगाकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे सरकार काही तरी करेल असे वाटत होते. परंतू या शासनानेही स्वामिनाथन आयोगाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शेतकर्‍यांची परिस्थीती अतिशय दयनिय असून स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी येत्या वर्षात आपण जनजागृती करणार असून माजी कृषी मंत्री शरद पवार ते एकनाथ खडसे यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढू वेळप्रसंगी शेतकर्‍यांच्या पश्‍नांवर पंतप्रधानांच्या कार्यालयातही घु सू असा इशारा प्रहारचे संस्थापक आ.बच्चू कडू यांनी दिला. आज दि. 18 जानेवारी रोजी स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
साडे तिन लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्यावरही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात येत नाहीत. दुसरीकडे कुठल्याही कर्मचार्‍याची पगार वाढवा म्हणुन आत्महत्या होत नसतांना सातव्या वेतन आयोग देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वामीनाथन आयोग लागु करा, अन्यथा पेरणी ते काढणीपर्यंतची शेती कामे ही एमआरईजीएस मध्ये घ्या, या मागणीसाठी वर्षभर प्रहार संघटना आंदोलनातुन जनजागृती करणार आहे. अशी माहिती प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चुकडू यांनी दिली. महत्वाचं म्हणजे एकनाथ खडसे ते शरद पवार यांच्या घरापर्यंत अशी यात्रा काढून मंत्र्याच्या घरासमोर ठिय्या देण्यात येणार आहे. मागणी मान्य न झाल्यास वर्षभराच्या शेवटी 31 डिसेंबरला पंतप्रधानांच्या कार्यालयात घुसण्याचा इशाराही आ. बच्चू कडू यांनी दिला. 
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, प्रा.दिपक धोटे, उप जिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, संभाजी देशमुख उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आघाडी पाठोपाठ भाजप सरकारही अपयशी ठरल्याचे सांगीतले. एखाद्या कृषी मालाचे भाव वाढल्यास महागाईच्या नावाखाली सरकार नियंत्रण आणुन भाव वाढ कमी करते. मात्र, त्याचवेळी शेतकर्‍यांच्या पडलेल्या मालाच्या भावाला मात्र कधीच वाढ देण्याचे धोरण राबविण्यात आले नाही. एकतर भाववाढ द्यावी, नाहीतर उत्पादन खर्च तरी कमी करावा, अशी आपली आग्रही मागणी आहे. आतापर्यंत पगार वाढ व्हावी म्हणुन कर्मचार्‍यांचे आत्महत्या झाल्याचे किंवा होण्याचे अपेक्षीत नाही. तरीही त्यांना पगार वाढीचा वेतन आयोग बहाल केल्या जात आहे. मात्र, त्याचवेळी लाखो शेतकरी जिवन यात्रा संपवित असतांना 2006 पासुन स्वामिनाथन आयोग पडून आहे. शिक्षकाला शाळेत जाण्याचा पगार मिळतो. कर्मचार्‍याला त्याचा कामाचा पगार मिळतो. शेतकर्‍याला शेतात जाण्याचा कुठलाही पगार मिळत नाही.   यासाठी वर्षभर आंदोलनात्मक जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदवीधर मतदार संघाची निवडणूक मुद्यांच्या विचारावर लढाणार असुन बेरोजगारांच्या समन्यायी नोकर्‍यांसाठी लढा उभारणार असल्याचेही सांगत बुलडाणा जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची फळी उतवरण्याचेही त्यांनी जाहिर केले.