संगणक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बुलडाणा (प्रतिनिधी) । 19 - राज्यतील संगणक शिक्षकांना कायम सेवेत घेण्यात यावे, शिक्षण विभागाने संगणक शिक्षकांच्या बाबतीत धोरण ठरवावे आदि मागण्यांसाठी आयसीटी शिक्षक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयसीटी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना संगणक साक्षर व संगणकाचे ज्ञान देण्यासाठी सन 2008 मध्ये आयसीटी योजना देशभरात सुरु केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात फेज-1, फेज-2, फेज-3 मध्ये विविध कंपन्यांशी सर्व्हिस लेव्हल अॅग्रीमेंट करुन सुमारे 8 हजार शिक्षकांना पे तत्वावर कंपन्यांच्या वतीने पाच वर्षासाठी नेमणुका देण्यात आल्या आहेत. शासनाने संगणक शिक्षकांना कायम स्वरुपी रोजगार द्यावा या मागणीसाठी राज्यातील संगणक शिक्षकांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केलेली आहेत. तसेच नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपण राज्यातील कार्यरत संगणक शिक्षकांना बेरोजगार होवू देणार नाही, तसेच संगणक शिक्षकांना कायम करण्यासाठी सरकार लवकरच धोरण निश्चीत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही ठोस धोरण घेण्यात आलेले नाही. यामुळे संगणक शिक्षक सर्व महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 18 जानेवारी रोज सोमवारला सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला.यामध्ये जिल्हाध्यक्ष नितीन शेळके, विजय खरपकार यांसह बहुसंख्य आयसीटी शिक्षकांची उपस्थिती होती.