Breaking News

एसएमएस पाठवून बिल्डर अमर भाटियांची आत्महत्या

उल्हासनगर, 19 -  बिल्डर अमर भाटिया यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ती खरंच आत्महत्या आहे की खून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोहन ग्रुपची सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल. 
या ग्रुपचे तरूण, 38 वर्षीय डायरेक्टर अमर भाटिया यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सापडला. त्यांच्या मृतदेहाचे डोके आणि धड वेगळे झाले होते. भाटियांचा मृत्यू अपघाती असावा, असा प्राथमिक अंदाज उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांनी वर्तवला. मात्र व्हिसेरा आणि रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल.
मयत अमर भाटिया यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मामांना एसएमएस पाठवला होता. ’मी खूप तणावाखाली आहे. माझ्या मुलांना सांभाळा. मी आत्महत्या करत आहे’, असे त्यांनी एसएमएसद्वारे कळवले होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत राणे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस सर्व शक्यता विचारात घेऊन पुढील तपास करत आहेत.