Breaking News

पंजाबच्या ग्रामविकास मंत्र्यांची हिवरेबाजारला भेटपंजाबच्या ग्रामविकास मंत्र्यांची हिवरेबाजारला भेट


 अहमदनगर । प्रतिनिधी । 12 - पंजाब राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री सिकंदर सिंग मालुका यांनी रविवारी आदर्शगाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामविकास राज्यमंत्री मंतर सिंग, रोजगार हमी योजनेचे आयुक्त जी. एस. घुमान आदी उपस्थित होते. हिवरेबाजारमध्ये लोकसभागातून झालेला विकास पाहून पंजाबचे मंत्री आणि अधिकारी चकीत झाले. त्यांनी पंजाबमधील प्रत्येक जिल्ह्यातून पथके हिवरेबाजारला पाठवण्याची घोषणा यावेळी केली. 
रविवारी सकाळी पंजाबचे ग्रामविकास मंत्री मालुका, सिंग, घुमान हिवरेबाजारमध्ये पोहोचले. यावेळी आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रांताधिकारी वामन कदम, तहसीलदार सुधीर पाटील, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे आदी उपस्थित होते. मंत्री सिंग म्हणाले, पंजाब राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाठी 9 ते 22 कोटी रुपये पर्यंतचा निधी दरवर्षी देण्यात येतो. मात्र, हिवरेबाजारने लोकसहभागातून 25 वर्षात सव्वाचार कोटी रुपयांतून मोठी लोकोपयोगी कामे केलेली आहेत. हिवरेबाजारचे उपक्रम नावीण्यपूर्ण असून यामुळे गावाचे चित्र पालटले आहे. जर गावाच्या सरपंचाने पुढाकार घेवून गावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला तर काहीही अशक्य नाही, याचे उदाहरण हिवरेबाजार आहे. यामुळे पंजाबमधील प्रत्येक जिल्ह्यातून शिष्टमंडळ हिवरेबाजारच्या भेटीसाठी पाठवण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. यात 50 टक्के महिला आणि 50 टक्के पुरुषांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले