Breaking News

पोटनिवडणूक; 11 मध्ये सेना,15 मध्ये राष्ट्रवादी विजयी


 अहमदनगर । प्रतिनिधी । 12 - महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्र.11 अ मध्ये भाजप सेनेचे उमेदवार योगीराज शशिकांत गाडे तर प्रभाग क्र. 15 अ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती भोसले या विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र.11 मधील निवडणूक सेना व राष्ट्रवादी प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकारी निवडणुक केंद्रावर उपस्थित होते. शेवटी सेनेने लढाईत बाजी मारली. 
महापालिकेच्या वरील दोन प्रभागात रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी मनपाच्या जुन्या इमारतीमध्ये निवडणुक निर्णय अधिकारी बेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. अवघ्या काही तासातच निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला. सेनेचे उमेदवार योगिराज गाडे विजयी झाल्याचे घोषित करताच सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनपासमोर घोषणा देऊन विजयोत्सव साजरा केला. 
पोटनिवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना मिळालेली मते अशी - प्रभाग क्र.11 मध्ये शोभा बोरकर (राष्ट्रवादी) 1746, योगिराज गाडे (सेना) 2451, चंद्रसेन साळवे (काँग्रेस) 245, चंद्रकांत शेळके (अपक्ष) 13 अशी मते मिळाली आहेत. 7506 एकूण मतदारांपैकी 4487 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 32 नोटा मते निघाली आहेत. प्रभाग क्र. 15 अ मध्ये 5905 मतदारांपैकी 3687 मतदारांनी हक्क बजावला. यात 41 मतदारांनी नोटा पुढील बटण दाबल्याचे दिसून आले. यात भारती भोसले (राष्ट्रवादी) 1411-विजयी, शिला चव्हाण (काँग्रेस) 764, कोमल साबळे (भाजप) 343, राधिका साठे  253, जयश्री शिंदे 138, गिरीजा उडाणशिवे 610 मीना वडागळे 28, सोनम वैरागर 99 (सर्व अपक्ष) अशी आहेत. 
प्रभाग क्र. 11 मधील निवडणूक राष्ट्रवादीसह सेनेने प्रतिष्ठेची केल्याने निवडणुक केंद्राबाहेर सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, माजी आ.अनिल राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, सौ.पडोळे, सौ. आशा निंबाळकर, भाजपचे नगरसेवक अभय आगरकर,सुवेंद्र गांधी,  बाळासाहेब गायकवाड, माजी महिला नगरसेविका संगीता खरमाळे, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, नगरसेवक स्वप्नील शिंदे, कुमार वाकळे, सुर्यवंशी तसेच काँग्रेसच्या महिला सविता मोरे, शारदा वाघमारे, रंजना ताठे, संध्या मेढे यांच्यासह पदाधिकारी सकाळपासून ठाण मांडून बसले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अनेक वेळा वादा-वादी झाली. ही वादा-वादी पोलिसांना व मतदारांना डोके दुखी ठरली होती. अनेक वेळा पदाधिकार्‍यांना मतदान केद्राबाहेरही काढण्यात आले. पोलिसांसमक्ष वाहनातून मतदारांची ने-आण सुरु होती. अनेकांनी निवडणुक आचार संहितेला केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसून आले. 
प्रभाग क्र 15 मध्ये सकाळी 8 पासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया रात्री 7 वा. संपली.