श्रीपाल सबनीसांची दिलगिरी ; पंतप्रधान मोदींबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य
पुणे/प्रतिनिधी । 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्याबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्यामुळे अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी याप्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ममी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असून कोणाचीही माफी मागणार नाही, पण माझ्या वक्तव्यामुळे
कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतोफ असे सबनीस यांनी म्हटले आहे.
आकुर्डी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सबनीस यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. मदहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली द्यावी लागली असती, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून मोठा गदारोळ माजला. या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात होती, उमरगा येथील कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन नीट पार पडेल का असा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी पाटील यांच्या मध्यस्थीमुळे
सबनीस दिलगिरी व्यक्त करण्यास तयार झाल्याने या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.